अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल

डेल्टा हा करोना विषाणूचा भारतात सापडलेला प्रकार गंभीर आजार निर्माण करतो शिवाय तो कांजिण्यांच्या विषाणूसारखा वेगाने पसरतो, असे अमेरिकी आरोग्य अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अंतर्गत अहवालात म्हटले आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने तयार केलेल्या एका अहवालानुसार पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींकडूनही डेल्टा विषाणूचा प्रसार होऊ शकतो. लस न घेतलेले व घेतलेले लोक या दोन्ही गटांकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो.

दी वॉशिंग्टन पोस्टने एका सरकारी सादरीकरणाच्या आधारे हे वृत्त दिले असून सीडीसीच्या संचालक डॉ. रॉशेली वॅलेन्स्की यांनी मंगळवारी असे म्हटले होते की, डेल्टा विषाणूचा संसर्ग नाक व घशावाटे होतो. लसीकरण न झालेले लोकही सारख्याच प्रमाणात विषाणूचा प्रसार करीत असतात. पण फार वेळा असे घडते असे नाही. डेल्टा विषाणू हा मर्स, सार्स, इबोला, सर्दीचा विषाणू, मोसमी फ्लू या विषाणूंइतकात वेगाने पसरतो. तो कांजिण्यांच्या विषाणू इतकाच संसर्गजन्य असतो, असे दी न्यूयॉर्क टाइम्सनेही या कागदपत्रांच्या आधारे म्हटले आहे.

‘लसीकरणानंतरही मुखपट्टीचा सल्ला चुकीचा’

वॉशिंग्टन : अमेरिकेतील लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेमोक्रॅटिक प्रशासन भारतातील एका अभ्यासाची भीती दाखवून मुखपट्टी लावण्याचा सल्ला देत असून एका शहानिशा न झालेल्या अभ्यासाच्या आधारे अशा प्रकारे मुखपट्टी वापरण्याचा सल्ला देणे योग्य नाही,  असे रिपब्लिकन नेत्यांनी म्हटले आहे.