देशामध्ये २४ एप्रिलपासून करोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी आंध्र प्रदेशमधील एका बापाला सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह घेऊन ८८ किलोमीटरची पायपीट करावी लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एका लहानश्या खेड्यात राहणाऱ्या या वक्तीला आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी इतकं अंतर पायी चालावं लागलं.

लॉकडाउनमुळे देशातील अनेक भागांमध्ये संचारबंदीचे कडोकोरपणे पालन केलं जात आहे. त्यामुळेच अनंतपुरम जिल्ह्यातील गोरांतला गावातील ही बातमी समोर येण्यासाठी एक आठवडा लागला. मनोहर (३८) असं या व्यक्तीचं नाव असून तो रोजंदारीवर काम करतो. मनोहरचा पाच वर्षांचा मुलगा देवा हा अचानक आजारी पडला. घशाचा संसर्गाचा त्रास देवाला होत होता. त्यावच उपचार करण्यासाठी आधी देवाला स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र देवाची प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती. उलट त्याची प्रकृती खालावत चालल्याने त्याला हिंदूपूरमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं.

तेथील डॉक्टरांनी देवाला वाचवायचं असेल तर त्याला मोठ्या आणि अत्याधुनिक सेवा असणाऱ्या रुग्णालयामध्ये नेण्याची गरज असल्याचं मनोहरला सांगितलं. मात्र मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणतेच साधन उपलब्ध नव्हतं. अखेर बुधवारी देवाच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव झाला आणि त्यानंतर काही काळातच त्याचा मृत्यू झाला.

संचारबंदीमुळे कोणतेच वाहन उपलब्ध नसल्याने मनोहरने देवाचा मृतदेह हातात घेऊन चक्क ८८ किलोमीटरचे अंतर पायी कापले. चित्रावती नदीच्या किनारी मनोहरने आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केले.

Story img Loader