करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून मृतांचा आकडा तीन हजाराच्या पार गेला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रुग्णांच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असून नौदलाचं १००० बेड्सचं जहाज (USNS Comfort) न्यूयॉर्कमध्ये दाखल झालं आहे. गव्हर्नर या जहाजाच्या स्वागतासाठी हजर होते.

जहाजावरील रुग्णालयात पूर्ण वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार असून सर्जरीदेखील केली जाणार आहे. शिवाय आयसीयू आणि वॉर्डची सुविधा असणार आहे. यामुळे स्थानिक डॉक्टरांना पूर्ण लक्ष करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यावर केंद्रीय करण्यास मदत मिळणार आहे. न्यूजवीकने यासंबंधी अमेरिकेच्या नौदलाशी बातचीत केली.

“गेल्या काही काळात आम्ही खूप अडचणींचा सामना केला आहे. आम्हाला याची गरज होती. हे जहाज आल्याने फक्त डॉक्टर आणि बेड्सची संख्या वाढलेली नाही तर आशाही उंचावल्या आहेत,” असं न्यूयॉर्क शहराचे मेयर ब्लासिओ यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- करोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या एकाच कुटुंबातील १७ जणांना लागण; रुग्णाच्या भाचीचा संर्गामुळे मृत्यू

मे महिन्यापर्यंत न्यूयॉर्क शहरात बेड्सची संख्या तिपटीने वाढवावी लागणार आहे. करोनाच्या रुग्णांवर उपचार कऱण्यासाठी सेंट्रल पार्कमध्ये रुग्णालय उभारण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बोलताना तात्पुरत्या स्वरुपातील या रुग्णालयांमध्ये कामकाज सुरु झालं असल्याची माहिती दिली होती. ब्रुकलीन येथे ६०० बेड्सची क्षमता असलेलं रुग्णालय उभारण्यात आलं असून वॉल स्ट्रीट येथील अनेक इमारतींचाही वापर केला जात आहे.

आणखी वाचा- Cronavirus: “काही लोक मरणारच, पण त्यासाठी अर्थव्यवस्थेची वाट लावू शकत नाही”

आगामी दिवसांमध्ये अमेरिकेतील परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या ६७ हजार करोनाचे रुग्ण असून १३४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Story img Loader