देशात तसंच जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. सध्या या आजारावर कोणतंही औषध नसलं तरी वैज्ञानिकांकडून यावर औषध तयार करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या भारतातही हैदराबादमध्ये करोनाच्या लसीवर संशोधन सुरु आहे. या लसीची महत्त्वाची बाब म्हणजे ही लस कोणत्याही इंजेक्शन प्रमाणे नाहीतर पोलिओ ड्रॉपप्रमाणेच दिली जाणार आहे. परंतु ती तोंडाद्वारे नाही तर नाकाद्वारे शरीरात पोहोचवण्यात येईल.
हैदराबादमधील भारत बायोटेक कोरोफ्लू नावाची लस विकसित करत आहे. करोनाचा सामना करण्यासाठी ही लस तयार करण्यात येत असून इंजेक्शनप्रमाणे ही लस देण्यात येणार नाही. तर करोनाग्रस्तांना नाकाद्वारे ही लस दिली जाणार आहे. नाकाद्वारे केवळ एक थेंब करोनाग्रस्तांच्या शरीरात सोडण्यात येईल. लसीचं पूर्ण नाव ‘कोरोफ्ल्यू-वन ड्रॉप कोविड १९ नेसल वॅक्सिन’ असं आहे. इंडिया टू़डेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यापूर्वीही कंपनीनं फ्ल्यूच्या आजारासाठी तयार केलेली औषध रुग्णांसाठी सुरक्षित होती, असं कंपनीचं म्हणणं आहे,
ही लस तयार करण्यासाठी भारत बायोटेकनं युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मेडिसन आणि फ्ल्यूजेन या कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. या तीन कंपन्यांचे वैज्ञानिक करोनाच्या लसीवर संशोधन करत आहेत. जेव्हा हे औषध संबंधित रूग्णाच्या शरीरात जातं तेव्हा शरीरात फ्ल्यूविरोधात लढण्यासाठी अॅन्टिबॉडिज तयार होतात. यावेळी योशिहिरो कावाओकानं एम२एसआर औषधामध्ये कोविड १९ चं जीन सिक्वेंन्स अॅड केल्याचं सांगण्यात येत आहे.
एम२एसआर बेसवर तयार होणाऱ्या क्लोरोफ्ल्यू औषधात कोविड-१९ चे जीन सिक्वेन्स अॅड केल्यानंतर आता हे औषध करोनाचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. जेव्हा हे औषध करोनाग्रस्ताच्या शरीरात सोडलं जाईल तेव्हा ते करोना व्हायरसविरोधात अॅन्टिबॉडी तयार करेल असंही सांगण्यात येत आहे. “आम्ही भारतातच या लसीचं उत्पादन करणार आहोत. त्यापूर्वी त्याची क्लिनिकल ट्रायव घेतली जाईल. त्यानंतर जगभरात वितरणासाठी ३०० दशलक्ष डोस तयार करण्यात येतील,” अशी माहिती कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड डॉ. रॅशेस एला यांनी दिली. या औषधाचे क्लिनिकट ट्रायल सध्या बाकी आहे. तसंच या वर्षाच्या अखेरपर्यंत मानवांवर याची चाचणी घेण्यात येईल. तोपर्यंत युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मेडिसनमध्ये यावर चाचणी घेण्यात येणार आहे.