करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील नागरिक आता सरकारने शहरे लॉकडाउन करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याची मस्करी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करण्याचे आवाहान केलं होतं. त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजता करोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसबरोबरच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मोदींनी बाल्कनीमधून टाळ्या किंवा थाळ्या वाजवण्यास सांगितले होते. मात्र गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशबरोबर इतर अनेक राज्यांमध्ये लोक संध्याकाळी पाच वाजता मोठ्या संख्येने एकत्र येऊन थाळ्या, घंटा वाजवून शंखनाद करताना दिसले. मुंबईतही काही ठिकाणी हे चित्र दिसलं. काही ठिकाणी तर लोकं झेंडे घेऊन ‘भारत माता की जय’च्या घोषणा देतानाही दिसले. त्यानंतर सोमवारी देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे तिथे बाजारांमध्ये लोक मोठ्या संख्येने दिसून आली. त्यामुळे लोकांनी गर्दी करु नये म्हणून लॉकडाउन करण्याचा सरकारचा मूळ हेतूच फसल्याचे चित्र दिसत होते. भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये लोक लॉकडाउनला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. लॉकडाउनच्या काळात अनेकजण कारण नसताना बाहेर फिरताना दिसून येत आहेत. अशा लोकांना स्वत:ची तर काळजी नाहीच पण दुसऱ्यांचीही नाही असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. युरोपमध्ये सध्या करोना ज्या देशांमध्ये थैमान घालत आहे त्या देशांमध्ये काही आठवड्यांपूर्वी हेच चित्र दिसून आलं होतं. या देशातील लोकांनी लॉकडाउन गांभीर्याने घेतलं नाही त्या देशांना आता त्याची किंमत मोजावी लागत आहे. जाणून घेऊयात काय चुकलं जर्मनी, स्पेन, इटली, अमेरिका आणि फ्रान्सचं….

जर्मनी

जर्मनीमध्ये करोनाचा संसर्ग प्राथमिक स्तरावर होता तेव्हा येथील तरुणांनी चक्क करोना पार्ट्यांचे आयोजन केलं होतं. या पार्ट्यांमध्ये अनेकजण मुद्दाम खोकत आजाराची मस्करी करत होते. आजारी लोकांना टोमणे मारत होते. जर्मनीच्या दक्षिणेला असणाऱ्या बावेरिया प्रांताचे अध्यक्ष मार्कस जोएडर यांनी अजूनही जर्मनीमध्ये अनेक ठिकाणी करोना पार्ट्यांचे आयोजन केलं जात आहे असा दावा केला आहे. अनेक तरुण येथे वयस्कर लोकांची खिल्ली उडवत आहेत. म्हतारे लोकं दिसताच करोना करोना अशी घोषणाबाजी करण्याचे काही प्रकार समोर आले आहेत. जर्मनीमध्ये करोनाचे गांभीर्य न ओळखता टवाळक्या करणाऱ्या तरुणांचे अनेक गट आहेत. हे प्रकार वाढू लागल्यानंतर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी दोनहून अधिक लोकांनी सर्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये असे आदेश जारी केले आहेत. एका कुटुंबातील दोनहून अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल होम क्वारंटाईन झाल्या आहेत. नुकतीच एका डॉक्टरांनी एंजेला मर्केल यांची भेट घेतली होती. दरम्यान, त्यांची भेट घेतलेले डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मार्केल या स्वत: एका सुपरमार्केटमध्ये खरेदी करता दिसल्या होत्या. त्यांच्या ट्रॉलीमध्ये वाईनच्या बाटल्या आणि टॉयलेट पेपर असल्याचे दिसून आले होते.

फ्रान्स

फ्रान्समध्येही सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर अनेक विद्यार्थी आणि नागरिक धम्माल करण्याच्या नावाखाली समुद्रकिनाऱ्यांवर एकत्र येताना दिसत आहेत. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाउनला आणि डॉक्टरांच्या सल्लांना ते जुमानताना दिसत नाहीयत. त्यामुळेच अखेर सरकारी अधिकाऱ्यांनीच अशा लोकांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. “काही लोकं नियम मोडून स्वत:ला हिरो असल्याचे समजतात. मात्र असं काहीही नसून हे लोक निव्वळ मूर्ख आहेत. हे लोकं स्वत:साठी आणि स्वत:च्या नातेवाईकांसाठी संकटाला आमंत्रण देत आहेत,” असं मत फ्रान्सचे गृहमंत्री क्रिस्टॉफ कॅस्टानेर यांनी व्यक्त केलं आहे. फ्रान्समध्ये लोकं मोठ्या संख्येने पार्ट्यांना आणि क्लबमध्ये उपस्थिती लावताना दिसत आहेत. शहरातील नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे करोनाचा संसर्ग ग्रामीण भागांमध्ये तसेच किनारपट्टीच्या भागांमध्ये होऊ शकतो अशी भिती सरकारने व्यक्त केली आहे. ग्रामीण भाग आणि किनारपट्टी भागांमध्ये आरोग्यसेवा जास्त सक्षम नसल्याने या भागांमध्ये करोनाचा फैलाव झाल्यास फ्रान्सवर मोठे संकट येईल अशी भिती सरकारला आहे.

पॅरिसमधील सीन नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या मार्गांवर भटकंतीसाठी बंदी घालण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीसमध्ये रात्री कर्फ्यू लावण्यात आला आहे. फ्रान्समध्ये चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लोकांनी घरातून बाहेर पडू नये याची काळजी आता पोलीस घेताना दिसत आहेत. जे लोकं लॉकडाउनचा नियम मोडून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मोठ्या रकमेचा दंड ठोठावला जात आहेत. फ्रान्समध्ये सध्या १७ हजार पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे.  फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लॉकडाउनचा कालावधी १५ दिवसांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.

अमेरिका

अमेरिकेतील फ्लोरिडाच्या राज्यपालांनी सर्व समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून अनेक विद्यार्थी या समुद्रकिनाऱ्यांवर पार्ट्या करण्यासाठी जमत होते. येथे होणाऱ्या पार्ट्यांमध्ये धांगडधिंगा आणि नाच-गाणे अगदी रात्रीपर्यंत चालायचे. त्यामुळेच सरकारने कमीत कमी लोकं एकत्र यावीत असे प्रयत्न सुरु असतानाच होणाऱ्या या पार्ट्यांवर बंदी घातली आहे. न्यूयॉर्कचे राज्यपाल अण्ड्यू क्युमो यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्कमध्ये अढळून आलेले करोनाचे अर्ध्याहून अधिक रुग्ण हे १८ ते ४९ वयोगटातील आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी तरुणांना सतर्क केलं आहे. “तुम्ही काही सुपरमॅन किंवा सुपरवुमन नाही. त्यामुळे आपल्याला करोना होणार नाही या भ्रमात राहू नका. सरकार काय सांगत आहे हे लक्षात घ्या,” असं आवाहन राज्यपालांनी केलं आहे. न्यूयॉर्क शहरामधील मोठ्या पार्कमध्येही अनेक लोकं भटकण्यासाठी येताना दिसत आहेत. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचा सरकारी यंत्रणांचा सल्ल्याचे गांभीर्य लोकांना नसल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्येही रात्रीच्या वेळी लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

इटली

करोना विषाणूच्या संसर्गाला हलक्यात घेणं इटलीलाही महागात पडलं आहे. सरकारने १० मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. मात्र येथील नागरिकांनी या लॉकडाउनचे पालन केलं नाही. लॉकडाउन असतानाही इटलीमधील अनेक शहरांमध्ये लोकं खरेदीसाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसले. हॉटेलिंग, बार आणि क्लबमध्ये रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्या, रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले बाजार असं चित्र लॉकडाउनच्या काळात इटलीमध्ये होते. इटलीमधील लॅम्बार्डी या भागामध्ये करोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झाला आहे. येथेही लॉकडानचे नियम पाळण्यात आले नाही. राज्य सरकारनेच लॉकडाउन गांभीर्याने न घेतल्याची कबुली दिली आहे. आता लष्कराच्या मदतीने लोकांना बळजबरीने घरात राहण्यास भाग पाडलं जातं आहे.

स्पेन

स्पेनमध्ये लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलीस चक्क हेलिकॉप्टर्सच्या मदतीने पकडत आहेत. लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडून इतरांना भेटणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सुचना केल्या आहेत. कॅटेलोनियामध्ये पोलिसांनी एका महिलेला अटक केली तेव्हा ती लॉकडाउन असताना शहरामध्ये डेटींग अपवर भेटलेल्या मित्राला भेटण्यास जात असल्याचे निदर्शनास आले. आता स्पेनमध्ये लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जात असून त्यांच्याकडून मोठ्या रक्कमेचा दंड आकारला जात आहे.