गुजरातमधील भाजपा कार्यकर्ता स्थलांतरित मजुरांकडून तीन पट रेल्वे भाडं घेत असून विरोध करणाऱ्या एका मजुराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेस नते सरल पटेल यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पीडित व्यक्ती भाजपा कार्यकर्ता राजेश वर्मा स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे तिकीटासाठी अतिरिक्त पैसे आकारत असल्याचं सांगत आहे.
“मी तिकीट घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही त्याला एक लाख १६ हजार रुपये दिले होते. पण आता तो पैसे किंवा तिकीट काहीच देणार नसल्याचं सांगत आहे. दोन हजार रुपयाला एका तिकीटाची विक्री तो करत आहे. मी विरोध केला असता त्याच्या माणसांनी मला मारहाण केली,” असं व्हिडीओतील व्यक्ती सांगताना दिसत आहे.
रक्तबंबाळ अवस्थेत दिसणारी ही व्यक्ती पुढे सांगत आहे की, “राजेश वर्माने मला सर्वात जास्त मारहाण केली. मला प्रचंड वेदना होत असून डोकं काम करत नाही आहे. त्याला पैसे दिल्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. आमच्याकडे तिकीटाचे टोकन आहेत, पण तरीही तिकीट देत नाही आहे”.
यावेळी तिथे उपस्थित एक व्यक्ती ज्यांच्याकडे टोकन नंबर आहे त्यांना तिकीट दिलं जात नसून, टोकन नसलेले मात्र प्रवास करत असल्याचा दावा करत आहे. “आम्ही पैसे दिले आहेत, त्यामुळे तिकीट मिळालं पाहिजे. आम्ही सर्व अडचणीत आहोत. घरी जाण्यासाठी आमच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. आम्हाला तिकीट द्या जेणेकरुन घरी जाऊ शकतो,” असं ही व्यक्ती बोलताना ऐकू येत आहे.
Shocking video from Surat, Gujarat.
BJP worker Rajesh Verma asked 100 migrant workers from Jharkhand to pay for their train tickets in advance. They were charged 3x the original price.
When a migrant worker went to his house to protest, he was beaten & hit with wooden plank. pic.twitter.com/fXj5o5ojnu
— Saral Patel (@SaralPatel) May 8, 2020
व्हिडीओत व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचंही दिसत आहे. मारहाण करणारी व्यक्ती भाजपा कार्यकर्ता राजेश वर्मा आणि त्याचे सहकारी असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेस नेते सरल पटेल यांनी ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, “सुरतमधील धक्कादायक व्हिडीओ. गुजरातमधील भाजपा कार्यकर्ता राजेश वर्माने झारखंडच्या १०० स्थलांतरित कामगारांकडून ट्रेन तिकीटसाठी आधीच पैसे घेतले आहेत. तीन पट पैसे त्यांच्याकडून घेण्यात आले. त्याच्या घऱी निषेध करण्यासाठी गेले असता मारहाण करण्यात आली”.