देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. करोनाग्रस्तांची भारतातील संख्या दोन हजार ९०२ झाली आहे. शनिवारी सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहेत. देशामध्ये करोनाचा फैलाव वाढू लागल्याने रुग्ण शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत.

Live Blog

18:42 (IST)04 Apr 2020
महत्त्वाचा निर्णय! ५० कोटी भारतीयांना COVID 19 चाचणी, उपचार मोफत

करोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

17:10 (IST)04 Apr 2020
शिस्त पाळल्यास १४ एप्रिलनंतर काही भागांत लॉकडाउन शिथील होऊ शकतं, राजेश टोपेंचे संकेत

मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार आणि करोनाला हरवणार हा मंत्र प्रत्येकाने पाळला. स्वयंशिस्त राखली तर कदाचित १४ एप्रिलनंतर काही भागांमध्ये लॉकडाउन शिथील होऊ शकतं असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्वयंशिस्त पाळा. मी घरात थांबणार मी करोनाला हरवणार हा मंत्र पुन्हा एकदा दिला आहे.

16:54 (IST)04 Apr 2020
Coronavirus: स्वसंरक्षण ड्रेसचे ५० लाख PM Cares फंडाकडे वळवले, एम्सच्या डॉक्टरांचा गंभीर आरोप

स्वसंरक्षण ड्रेस खरेदी करण्यासाठी देण्यात आलेला ५० लाखांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या PM Cares फंडाकडे वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिल्लीमधील एम्स रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने हा आरोप करण्यात आला आहे. आरोपानुसार, भारत डायनॅमिक्सकडून देण्यात आलेला ५० लाखांचा निधी रुग्णालय प्रशासन आणि सीएसआर विभागाकडून मोदींच्या PM Cares फंडाकडे वळवण्यात आला आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

16:46 (IST)04 Apr 2020
रेशनकार्ड नसेल तर आधारकार्ड ग्राह्य धरून प्रत्येकाला धान्य द्या : देवेंद्र फडणवीस

ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांचे आधारकार्ड प्रमाण मानून आणि ज्यांच्याकडे आधारकार्ड सुद्धा नाही, अशांची यादी तयार करून, ती तहसिलदारांकडून प्रमाणित करून त्यांनाही धान्य द्या. या कालावधीत एकही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

16:38 (IST)04 Apr 2020
पालघर नगरपरिषदेनं तयार केलं 'ॲप'; जीवनावश्यक वस्तू करता येणार खरेदी

पालघर नगरपरिषदेने टाळेबंदीत नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्रीसाठी बायर-सेलर (BUYER-SELLER) ॲप तयार केले असून यामार्फत ऑर्डर केलेल्या वस्तू एका क्लिकवर घरातून बाहेर न जाता घरपोच मिळणार आहे. पालघरवासियांना घराबाहेर पडायला लागू नये यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

16:30 (IST)04 Apr 2020
५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी देशभरातले 'स्ट्रीट लाईट्स' नाही होणार बंद

५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले लाईट बंद करा आणि दिवा, मेणबत्ती किंवा मोबाइल टॉर्च सुरु करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी जनतेला केलं आहे. अशात पथदिव्यांना म्हणजेच स्ट्रीट लाईट्सना हा नियम लागू नसेल असं केंद्रीय उर्जा मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तसंच घरातली उपकरणे, अत्यावश्यक सेवा जसे की मेडिकल, हॉस्पिटल यांनाही लाइट बंद करणे बंधनकारक नाही. रस्त्यावरचे दिवे हे जनतेच्या सुरक्षेसाठी सुरु ठेवावेच लागतील असंही उर्जा मंत्रालयाने म्हटलं आहे.

16:23 (IST)04 Apr 2020
भारतात करोनाचे एकूण २९०२ रुग्ण

भारतात आतापर्यंत करोनाचे २९०२ रुग्ण आहेत. शुक्रवारी ६०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ६८ वर पोहोचला आहे. १८३ जणांवर उपचार करुन त्यांना घऱी सोडण्यात आलं आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

15:57 (IST)04 Apr 2020
धारावीत करोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याचा इशारा

धारावीत करोनाचा चौथा रुग्ण आढळल्याने मुंबईसाठी धोक्याचाच इशारा मानला जातो हे. धारवी येथील बलिगा नगरमध्ये आणखी एक रुग्ण आढळला आहे. एका ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचं कळतं आहे. दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले पाचजण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहिले त्याचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

15:35 (IST)04 Apr 2020
एनजीओला फोन करुन जेवण मागवणाऱ्या कुटुंबाच्या घरी सापडला धान्यसाठा

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा काहीजण उचलत असल्याचं समोर आलं आहे. राजकोटमध्ये अशीच एक घटना घडली आहे. राजकोटमधील एका व्यक्तीच्या घरात रेशनचं सर्व सामान भरलेलं होतं. मात्र यानंतरही कुटुंबातील लोक संस्थेला फोन करुन जेवण मागवत होते. रोज कुटुंबातील एक सदस्य धान्य आणि जेवण मिळावं यासाठी संस्थेला फोन करत होतं. यानंतर संस्थाही जेवण पुरवत होती. तर दुसरी टीम त्यांना धान्य पुरवत होती. सविस्तर बातमीसाठी लिंक

15:34 (IST)04 Apr 2020
पनवेल : मरकजहून आलेल्या १० जणांची करोना चाचणी निगेटिव्ह

पनवेलकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमाहून आलेल्या १० जणांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे सर्वजण पनवेलचे रहिवासी आहेत. एकूण १२ जण या कार्यक्रमाला गेले होते, यांपैकी १० जणांचा शोध प्रशासनाने घेतला आहे. एकाचा शोध सुरु असून एक जण अद्याप दिल्लीहून परतलेला नाही.

15:29 (IST)04 Apr 2020
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढा आणि त्यांचे व्हिडीओ व्हायरल करा – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसावंर हल्ले करणाऱ्यांवर फोडून काढलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. करोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांचं खच्चीकरण करुन सध्या चालणार नाही. पोलिसांच्या चुका दाखवण्याची ही वेळ नाही. १२-१३ तास ते काम करत आहेत असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. सविस्तर बातमीसाठी लिंक

15:10 (IST)04 Apr 2020
शाहरूख खानने जिंकलं मन, विलगीकरणासाठी ऑफिसची इमारत देण्याची ऑफर

करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले असून विलगीकरणासाठी आपल्या कार्यालयाची इमारत देण्याची ऑफर महापालिकेला दिला आहे. शाहरुख खानने वांद्रे येथील आपली चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी देण्यास तयार आहोत असं मुंबई महापालिकेला सांगितलं आहे. या ठिकाणी सर्व गरजेच्या वस्तूदेखील आहेत. शाहरुख खान आणि गौरी खानने मदतीचा हात पुढे केल्याने महापालिकेने त्यांचे आभार मानले आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंक

14:44 (IST)04 Apr 2020
दुहीचा व्हायरस पसरवणाऱ्यांना सोडणार नाही-मुख्यमंत्री

करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणारच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोविडपासून महाराष्ट्राला वाचवणारच. मात्र दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.

14:27 (IST)04 Apr 2020
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कुठलाही उत्सव नाही : उद्धव ठाकरे

पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कुठलाही उत्सव साजरा करता येणार नाहीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात अनेक जत्रा, उत्सवांचं आयोजन रद्द करण्यात आलं. तसंच सर्वांनी ते करावं, असंही ते यावेळी म्हणाले.

14:10 (IST)04 Apr 2020
टप्प्याटप्प्यानं रेल्वे सेवा सुरु होणार; रेल्वेनं दिले संकेत

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आल्याने सध्या रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, लॉकडाउन संपल्यानंतर सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र, यावर अद्याप केंद्र सरकारकडून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. सविस्तर वृत्त वाचा

13:05 (IST)04 Apr 2020
शिवाजी पार्क परिसरात आढळला करोनाचा पहिला रूग्ण

देशात आणि राज्यात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच रोज करोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, आज शिवाजी पार्क परिसरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी राहणऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

12:12 (IST)04 Apr 2020
आज महाराष्ट्रात ४७ नवे रूग्ण, त्यातील ४३ मुंबई-ठाण्यात

आज चार एप्रिल रोजी महाराष्ट्रात करोनाचे एकूण ४७ नवे रूग्ण आढळले आहेत. यापैकी २८ मुंबईतील, १५ ठाण्यातील, दोन पुण्यातील, तर अमरावती व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एक आहे.

12:06 (IST)04 Apr 2020
समाजाची जबाबदारी मोठी, नुसता यंत्रणांना दोष नको - राज ठाकरे

करोनाशी लढण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, तरीही अनेक लोक घराबाहेर पडत आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. पत्रकारांच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपली भुमिका मांडली. लोकांनी शिस्त पाळली पाहिजे. सध्याच्या काळात समाजाची मोठी जबाबदारी आहे. आपल्याला नुसतं यंत्रणांना दोष देऊन चारणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. सविस्तर वृत्त वाचा

11:17 (IST)04 Apr 2020
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील क्रीडा क्षेत्रातील विविध ४० महत्त्वाच्या खेळाडूंसोबत संवाद साधला. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी शेट्टी यांनी 'मोदीजी तुम्ही शेतकऱ्यांशी, मजूरांशी आणि डॉक्टरांशी चर्चा केली असती तर अजून आनंद झाला असता,' असा टोला पंतप्रधानांना लगावला आहे.येथे वाचा नक्की काय म्हणाले शेट्टी

11:17 (IST)04 Apr 2020
राज्य कर्मचारी विमा निगम कामगारांचे निम्मे वेतन देण्याबाबत प्रयत्नशील

राज्य कर्मचारी विमा निगमने या संकटप्रसंगी कामगारांचे निम्मे वेतन देण्याबाबत उद्योजक संघटना प्रयत्नशील आहे. उद्योग-व्यवसाहय ठप्प पडले असल्याने उद्योग मालकांपुढे कामगार मजुरांच्या वेतनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. उत्पादन नसतानाच वीज देयकं व अन्य खर्च भागविण्याची आपत्ती असतांनाच प्रामुख्याने कामगार व मजुरांचे वेतन देण्याची बाब अपरिहार्य ठरली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी उद्योजक संघटनेने कामगारांच्या वेतनासाठी एक पर्याय शासनापुढे मांडला आहे.

11:11 (IST)04 Apr 2020
लॉकडाउन वाढल्यास मोठं आर्थिक संकट

सर्वांना नम्र विनंती आहे लॉकडाउन गांभीर्यानं घ्यावा. लोकांसमोर अनेक प्रश्न आहेत. जीवनावश्यक वस्तू सरकार उपलब्ध करत आहे. लॉकडाउनचे दिवस वाढवले गेले तर त्याच्या होणाऱ्या परिणामांची भीती आहे. उद्योगधद्यांची भीती वाटते. परिस्थिती कठिण होईल. तसंच आर्थिक मोठं आर्थिक संकट येईल, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

10:26 (IST)04 Apr 2020
एका दिवसातील बाधितांचा उच्चांक; किमान २५ टक्के बाधित तबलीगी मरकजशी संबंधित

गेल्या तीन दिवसांतील करोनाबाधितांची देशातील संख्या १,२५१ वरून दुप्पट वाढून तीन एप्रिलपर्यंत २,५४७ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल २५ टक्के बाधितांचा संबंध गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या तबलीगी मकरजशी आहे. गेल्या २४ तासांमध्ये एका दिवसातील सर्वाधिक बाधितांची ४७८ इतकी संख्या नोंदवली गेली. यापैकी किमान २४७ जणांनी मरकजला हजेरी लावली होती. दिल्लीतील तबलीगी मरकजमध्ये देश विदेशातून सुमारे ४,००० भाविकांनी हजेरी लावली होती.

10:23 (IST)04 Apr 2020
देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

भारतामधील करोनाग्रस्तांची संख्या २९०२ झाल्याची माहिती कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी २ हजार ६५० जण करोनाबाधित असून १८३ जण आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहे.

10:14 (IST)04 Apr 2020
देश रात्री दिवे चालू ठेवून झोपतो का? राम कदमांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

'ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांशी किंवा अन्य तज्ज्ञांशी चर्चा न करता केवळ व्हाट्सअॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केले आहे. देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो की बंद करून झोपतो?यावरच तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो,' असं राम कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ऊर्जामंत्र्यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. रात्री दिवे बंद करून संध्याकाळी सुरू करतो तेव्हा ग्रीड कोसळते का? असा सवालही त्यांनी केला.

सविस्तर वाचा -

09:24 (IST)04 Apr 2020
महाराष्ट्रातील लॉकडाउन काही आठवड्यांनी वाढवला जाऊ शकतो; राजेश टोपेंनी दिले संकेत

राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

09:23 (IST)04 Apr 2020
“…तर संपूर्ण राज्य आणि देश एका आठवड्यासाठी अंधारात जाईल”; राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे देशात आलेला अंध:कार घालवण्यासाठी रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करुन दिवे पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता अनेकांनी एकाच वेळी लाईट्स बंद केल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन विजपुरवठा संपूर्ण राज्यच अंधारात जाईल अशी भीती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

09:14 (IST)04 Apr 2020
अमरावतीत करोनामुळं एकाचा मृत्यू

अमरावतीत एका करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीच्या श्वसनक्रियेत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आलं होतं. त्यामुळे त्याला इर्विन रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर उपचारांदरम्यान २ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा स्वॅब चाचणीचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह आला आहे.

09:10 (IST)04 Apr 2020
३० एप्रिल पर्यंत एअर इंडियाची तिकिट विक्री बंद

सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं ३० एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली. सध्या देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील काय निर्णय होईल याकडे आमचं लक्ष आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

सविस्तर वाचा -

09:07 (IST)04 Apr 2020
नाकाद्वारे दिली जाणार स्वदेशी करोना लस; लवकरच चाचणी?

देशात तसंच जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. सध्या या आजारावर कोणतंही औषध नसलं तरी वैज्ञानिकांकडून यावर औषध तयार करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या भारतातही हैदराबादमध्ये करोनाच्या लसीवर संशोधन सुरु आहे. या लसीची महत्त्वाची बाब म्हणजे ही लस कोणत्याही इंजेक्शन प्रमाणे नाहीतर पोलिओ ड्रॉपप्रमाणेच दिली जाणार आहे. परंतु ती तोंडाद्वारे नाही तर नाकाद्वारे शरीरात पोहोचवण्यात येईल.
सविस्तर वाचा-

08:44 (IST)04 Apr 2020
निम्म्या पृथ्वीवर निर्बंध लागू असूनही करोनाचा प्रसार कमी झालेला नाही

अमेरिका, स्पेन, ब्रिटन या देशात अजून करोना साथीची परमोच्च अवस्था अजून गाठायची आहे. इटलीत ११ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. करोनाच्या साथीची मोठी आर्थिक किंमत जगाने मोजली असून ६.६५ दशलक्ष अमेरिकी लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केले आहेत. अमेरिकेत १ कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते परिस्थिती आणखी वाईट होणार आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

08:43 (IST)04 Apr 2020
चीन: वुहानमध्ये पुन्हा निर्बंध लागू

चीनमध्ये संसर्गाची दुसरी लाट सुरू होण्याची भीती असतानाच आता वुहानमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.लक्षणे न दाखवणाऱ्या पण करोनाचा संसर्ग असलेल्या लोकांची संख्या वाढत असून नऊ आठवडय़ांची टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ती केवळ नावालाच शिथिल राहील असा याचा अर्थ आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

08:41 (IST)04 Apr 2020
देशभरात एका दिवसात आठ हजार चाचण्या

देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्याने रुग्ण शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी गेल्या चोवीस तासांमध्ये आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या असून आतापर्यंत एकूण ६६ हजार चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

08:40 (IST)04 Apr 2020
रविवारी दिवे लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

करोनाच्या महासाथीविरोधात देशावासीयांना पुन्हा एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरचित्रवाणी संदेशाद्वारे केले. रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लोकांनी आपापल्या घरातील दिवे बंद करावेत व मेणबत्ती, मोबाइलचा दिवा वा बॅटरीचा दिवा लावून दिव्यांचा झगमगाट करावा. हा प्रकाश म्हणजे करोनामुळे पसरलेल्या अंधकाराविरोधातील लढाई असल्याचे मोदी म्हणाले.येथे वाचा सविस्तर वृत्त

Story img Loader