एकीकडे देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स तसंच इतर आरोग्य कर्मचारी पहिल्या दिवसापासून दिवसरात्र मेहनत करत असताना दुसरीकडे त्यांच्यावर हल्ले होत असल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा पद्धतीने हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वारंवार होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आता यासंबंधी भाष्य केलं असून हे स्विकारलं जाऊ शकत नाही सांगत खडसावलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, “मला हे अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे की, पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्यासोबत हिंसाचार, असभ्य वर्तन आणि गैरवर्तन स्विकारलं जाऊ शकत नाही”. नरेंद्र मोदी कर्नाटकमधील राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रमात बोलत होते. नरेंद्र मोदींच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, “जर करोनाचं संकट नसतं तर मला तिथे तुमच्यासोबत उपस्थित राहायला आवडलं असतं. आजच्या घडीला संपूर्ण जग डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि संशोधकांकडे आशेने पाहत आहे. जगाला तुमच्याकडून काळजी आणि उपाय दोन्हींची गरज आहे. “करोना व्हायरस एक अदृश्य शत्रू असेल, पण आपले योद्धा आरोग्य कर्मचारी अजिंक्य आहेत. या लढाईत आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच विजय होणार,” असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार करोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. यासोबत भारताने फ्रान्सला मागे टाकलं आहे. फ्रान्समध्ये करोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत करोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये करोनाचे पाच लाख तर रशियात करोनाचे चार लाख रुग्ण आहेत.

रविवारी देशात करोनाच्या ८३८० नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहेत. तसंच रुग्णांची मृत्यूसंख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. रविवारी २४ तासात देशभरात १९३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसात करोनाबाधित रुग्णसंख्या आठ हजारांच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशात गेल्या तीन दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे भारत गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाउन शिथील करत असतानाच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

कोणता देश कोणत्या क्रमांकावर –
पहिल्या क्रमांकावर ब्राझिल असून त्यानंतर अनुक्रमे ब्राझिल, रशिया, स्पेन, इंग्लंड, इटली आणि त्यानंतर भारताचा क्रमांक आहे.