देशभरातील शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था सुरु कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यम्यांनी दिल्याने आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून यासंबंधी ट्विट करण्यात आलं आहे. “केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही. देशभराती सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत,” अशी माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच शाळा, कॉलेज बंद आहेत. दोन महिन्यांपासून शाळा बंद असल्याने सर्व पालकांना शाळा पुन्हा कधी सुरु होणार हा प्रश्न सतावत आहे. सोबतच लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला होता. यानंतर ३ मे आणि १७ मे रोजी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली. सध्या लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.