करोना व्हायरसने हाहाकार माजवला असून शक्तिशाली अमेरिकेलाही त्याचा फटका बसला आहे. अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव न्यूयॉर्कमध्ये पहायला मिळत आहे. सोमवारी एकाच दिवसात ५४० जणांचा मृत्यू झाला असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. परिस्थिती बिकट होत असल्याने न्यूयॉर्कच्या मदतीला नौदलाचं एक हजार बेड्सची सुविधा असणारं जहाज (USNS Comfort) पोहोचलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत करोनामुले ३१७० जणांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमधील लोक जहाजाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जहाजात अशा रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत ज्यांना करोनाची लागण झालेली नाही. जेणेकरुन स्थानिक रुग्णालयांमधील जागा आणि सामग्री करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी वापरता येईल. न्यूयॉर्क शहराचे मेयर बिल डी ब्लासियो यांनी सध्या युद्धासारखी परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे.
गव्हर्नर अँड्रू क्युओमो यांनी या जहाजाचं स्वागत करत ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, या जहाजात एक हजार बेड, १२०० मेडिकल स्टाफ, १२ ऑपरेशन थिएटर, लॅब आणि औषधं आहेत. प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. याआधी गव्हर्नर अँड्रू क्युओमो यांनी सांगितलं होतं की, सरकारने ३० हजार व्हेटिलेटर्सच्या जागी फक्त चार हजार बेड्स पाठवण्याचं मानय् केलं आहे. कोणत्याही सामग्रीविना लढाई लढत आहोत अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली होती.
We will fight every way we can to save every life we can.
Thank you, USNS Comfort. Welcome to New York. pic.twitter.com/ppGrJ0rGE5
— Andrew Cuomo (@NYGovCuomo) March 30, 2020
आतापर्यंत तीन हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू
अमेरिकेत करोनाने सर्वात जास्त नुकसान केलं आहे. अमेरिकेत १ लाख ६४ हजार २६६ जणांना करोनाची लागण झाली आहे. सोमवारी ५४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३१७० झाली आहे. करोनाचा कहर लक्षात घेता अमेरिकेने अनेक राज्यांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर काळजी घेण्यासाठी वारंवार आवाहन केलं जात आहे.