देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल… यावरून मतं मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितलं. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आहेत.

खासदार रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह आणि चित्रपट निर्माते विनोद कापरी आणि अविनाश दास यांच्यासह काही जणांनी करोना आणि कुंभमेळ्याबद्दल केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ट्विटर इंडियाला नोटीस बजावल्यानंतर नमूद करण्यात आलेले ट्विट ब्लॉक करण्यात आले असून, ब्लॉक करण्यात आलेले ट्विट भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे होते, असं ट्विटरने म्हटलं आहे.

ट्विट्स ब्लॉक करण्याच्या कारवाई बद्दल ट्विटरकडून जाहीरपणे भाष्य करण्यात आलेलं नाही. त्याचबरोबर कोणते विशिष्ट ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आणि का ब्लॉक करण्यात आले याबद्दलही ट्विटरने काहीही म्हटलेलं नाही. ट्विटरकडून ट्विट करण्यात आलेल्या अकाऊंट धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भारत सरकारने केलेल्या कायद्याचं ट्विटमुळे उल्लंघन होत असल्याचं म्हटलं आहे. नोटीसमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० उल्लेख करण्यात आला असून, त्यानुसार ट्विट्सवर कारवाई करत असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.

ट्विटरकडून कारवाई करण्यात आलेले ट्विट्स देशातील करोना औषधी आणि आरोग्य सुविधांची वाणवा याबद्दल भाष्य करणारी होती. औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाबद्दलची होती. तर काही ट्विट्स हरिद्वारमधील कुंभमेळ्याबद्दलची होती. देशात करोनाचा उद्रेक झालेला असताना होत असलेल्या कुंभमेळ्याबद्दल भाष्य करणारे ट्विट्सही ब्लॉक करण्यात आले आहेत. मात्र, जे ट्विट्स परदेशातून करण्यात आले आहेत, ते अजून दिसत असून, भारतातून करण्यात आलेले ट्विट्स मात्र डिलीट करण्यात आले आहेत.

ट्विटरचं म्हणणं काय?

जेव्हा आमच्याकडे कायदेशीपणे विनंती केली जाते. तेव्हा आम्ही ट्विटर नियम आणि स्थानिक कायद्याच्या अनुषंगाने संबंधित मजकुराची पडताळणी करतो. ट्विटरच्या नियमाप्रमाणे जर संबंधित कायदा असलेल्या क्षेत्रात मजकूर नियमांचा भंग करणारा ठरत असेल, पण ट्विटरच्या नियमांचा भंग होत नसेल, तर आम्ही हा मजकूर भारतापुरताच प्रतिबंधित करतो. सर्वच प्रकरणांमध्ये आम्ही थेट थेट खातेधारकाला सूचना देतो. कारण त्यांच्या अकाउंटसंबंधात आम्हाला कायदेशीर नोटीस आल्याची गोष्ट त्याला माहिती असावी. अकाऊंटसोबत जोडलेल्या खातेधारकाला आम्ही ई-मेलद्वारे याची सूचना देतो. आम्हाला मिळालेल्या कायदेशीर विनंत्या द्विभाषिक ट्विटर पारदर्शिता अहवालात तपशीलवारपणे दिलेल्या आहेत, तर मजकूर रोखण्यासाठीसंदर्भातील विनंत्या लुमेनवर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. हे समजून घेणं महत्वाचं आहे की, ट्विट ट्विटर प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आलेले नाहीत, तर ते केवळ भारतातच प्रतिबंधित करण्यात आले आहेत,’ असं ट्विटरने म्हटलं आहे.

Story img Loader