संयुक्त राष्ट्रांनी करोनाच्या साथीला जागतिक महामारी घोषित केलं आहे. गुरुवारी (२३ एप्रिल २०२०) सकाळपर्यंत जगभरातील २६ लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख ८० हजारांहून अधिकवर पोहचली आहे. आकडेवारी पाहता करोना हे खरोखरच जगासमोरील मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे. मात्र असं असतानाच आता कोलंबिया विद्यापिठातील प्रसिद्ध संशोधक आणि व्हायरोलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. लॅन लिपकीन यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे. मानव जातीवर आलेले करोना हे सर्वात मोठे संकट नसून भविष्यात यापेक्षाही मोठ्या संकाटांचा मानवाला समाना करावा लागणार आहे, असं लिपकीन यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात लिपकीन यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना मानवाची एकंदरितच हलचाल (म्हणजेच प्रवास, उद्योग आणि इतर गोष्टी) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच अशाप्रकारचे आरोग्याशी संबंधित संकटे निर्माण होत असून अशा संकटांना भविष्यातही तोंड द्यावे लागू शकते.

“सध्या आरोग्याशी संबंधित संकटांचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. जंगलं नष्ट होणे, लोकसंख्येचे स्थलांतर, आंतरराष्ट्रीय व्यापार, मानवामुळे होणारे वातावरणातील बदल या घटकांचा हा परिणाम असू शकतो असं मला वाटतं. या सर्व घटकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळेच संकटे येण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे,” असं लिपकीन म्हणाले. “स्पॅनिश फ्लूनंतर जगभरामध्ये एड्स, निफा, चिकनबुनिया, सार्क-१, मर्सच्या साथी येऊन गेल्या. मी अशा पद्धतीच्या जवळवजळ १५ साथींचा अभ्यास केला आहे,” असंही लिपकीन यांनी सांगितलं.

“करोनाची साथ हे सर्वात मोठे संकट आहे असं मला वाटतं नाही. निसर्गाशी संबंधित विषय आपण ज्या पद्धतीने हाताळत आहोत त्यात वेळीच बदल केला नाही तर अशाप्रकारची आणखीन एखादी साथ येऊ शकते. अशी संकटे वारंवार येत राहणार,” असा इशाराही लिपकीन यांनी दिला आहे. “वातावरणातील बदलांमुळे लोकांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून झपाट्याने आजार पसरत आहेत. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत ज्यांना अन्न पदार्थांच्या माध्यमातून पोषक तत्वे मिळत नाहीत. अशी लोक आता जंगली प्राणी खाऊ लागले आहेत. या प्राण्यांच्या माध्यमातून रोगांचा संसर्ग होत आहे. श्रीमंत लोकांकडे असणाऱ्या प्राण्यामधूनही मानवाला रोगांचा संसर्ग होऊ शकतो,” असा इशाराच लिपकीन यांनी दिला आहे.

अशापद्धतीची साथ वारंवार येऊ नये असं वाटत असल्यास आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल असं लिपकीन सांगतात. तसेच जागतिक स्तरावर माहितीची देवणघेवाण करणारी यंत्रणा तयार करावी लागेल. माहितीची देवणघेवाण केल्यास अशा पद्धतीच्या संकटांना आपण अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकतो, असं मत लिपकीन यांनी व्यक्त केलं.