केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा विश्वास; बाधितांची संख्या वाढतीच

करोनाच्या महासाथीमुळे अनेक विकसित देशांना भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. भारतात अतिवाईट स्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असली तरी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी व्यक्त केले. गेले आठवडाभर हर्षवर्धन यांनी प्रत्येक राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला आहे. दरम्यान, देशभरातील रुग्णसंख्या वेगाने वाढतच आहे.

हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के आहे आणि रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३० टक्कय़ांवर पोहोचलेले आहे. भारताच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. शिवाय, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाणही गेल्या तीन दिवसांमध्ये ११ दिवसांवर गेले आहे. सात दिवसांपूर्वी ते ९.९ दिवस होते.. देशभरात फक्त करोना रुग्णांवर उपचार करणारी ८४३ रुग्णालये असून त्यात १ लाख ६५ हजार ९९१ खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय, १९९१ आरोग्यसेवा केंद्रेही कार्यरत असून त्यात १ लाख ३५ हजार ६४३ खाटा आहेत.

देशभरात ७६४५ विलगीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. आत्तापर्यंत राज्यांना ६९ लाख एन-९५ मास्क तसेच ३२.७६ लाख पीपीईचे वाटप केले आहे. करोना महासाथीची सुरुवात झाली तेव्हा देशात करोनाची नमुना चाचणी घेणारी पुण्यातील एकच वैद्यकीय प्रयोगशाळा उपलब्ध होती. आता ४५६ प्रयोगशाळांमध्ये करोनाची नमुना चाचणी घेतली जात आहे. शुक्रवारी घेतलेल्या आढाव्यानुसार, फक्त ०.३८ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटर) ठेवलेले आहे. १.८८ रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे, तर २.२१ टक्के रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत, अशी माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.

केंद्रीय पथकांवर भर

महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली अशा काही राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने केंद्राकडून या राज्यांतील अधिक बाधित शहरांमध्ये पाहणी करण्यासाठी केंद्राकडून पथक पाठवले जात आहे. गुजरातमध्ये रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी तातडीने ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांचे पथक अहमदाबादला पाठवले. मुंबईतही केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांचे पथक गुरुवारी पाठवले होते. या पथकाच्या निरीक्षणानंतर राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी गरजेनुसार राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली जातील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

देशातील आठ शहरांमध्ये करोनाचे ६० टक्के रुग्ण असून त्यापैकी मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली या तीन शहरांमध्ये ४२ टक्के रुग्ण आढळले आहेत. अन्य पाच शहरांमध्ये पुणे, ठाणे, मध्य प्रदेशमधील इंदूर, तमिळनाडू आणि राजस्थानची राजधानी अनुक्रमे चेन्नई व जयपूर यांचा समावेश आहे. समूह संसर्ग सुरू झाला आहे का, याची खात्री करून घेण्यासाठी देशभरातील ७५ जिल्ह्य़ांमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेकडून (आयसीएमआर) आढावा घेतला जाणार आहे. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आढावा घेण्यात आला होता. समूह संसर्ग झाला नसल्याची अधिकृत भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कायम ठेवली आहे.

बाधितांवरील उपचार नियमांत बदल

नवी दिल्ली : करोनातून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे अधिक शिथिल करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी घेतला. त्यानुसार, अतिसौम्य-सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल तर नमुना चाचणी न करताही त्यांना घरी पाठवता येईल. फक्त गंभीर रुग्णांना सोडण्यापूर्वी नमुना चाचणी तसेच अन्य वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे.

चोवीस तासांत ३,३२० नवे रुग्ण..

गेल्या चोवीस तासांमध्ये ३,३२० नव्या रुग्णांची भर पडली असून ९५ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ५९,६६२ झाली आहे. एकूण मृत्यूची संख्या १,९८१ वर पोहोचली आहे. १७,८४७ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. करोनासंदर्भातील जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष प्रतिनिधी डॉ. डेव्हिड नाबारो यांनी एम्सचे संचालक गुलेरिया यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. टाळेबंदी उठवल्यानंतर रुग्णांमध्ये वाढ होणार असून जुलैमध्ये करोनाच्या प्रादुर्भावाचे शिखर गाठले जाण्याची शक्यता नाबारो यांनी व्यक्त केली.