देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याने चिंता व्यक्त होत असताना डेल्टा प्लसच्या विषाणूंनी यामध्ये भर टाकली आहे. दरम्यान देशातील काही तज्ज्ञ डॉक्टर तसंच जनुकीय क्रमनिर्धारकांनी (जिनोम सीक्वेन्सर) हे नवे विषाणू या संक्रमण वाढीस कारणीभूत ठरत नसल्याचं म्हटलं आहे. इन्सिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंटरग्रेटिव्ह बायालॉजीचे संचालक डॉक्टर अनुराग अग्रवाल यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरक्षेचे नियम कमी केले जाऊ नयेत अशी सूचना यावेळी केली आहे.
‘डेल्टा प्लस’चे देशात ४० रुग्ण
“सध्याच्या घडीला डेल्टा प्लसचा करोनाच्या तिसऱ्या लाटेशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे हाती नाहीत,” अशी माहिती डॉक्टर अग्रवाल यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे. “माझ्या संस्थेने जून महिन्यात महाराष्ट्रातील एकूण ३५०० नमुने गोळा केले. यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यातील नमुन्यांचाही समावेश होता. डेल्टा प्लसचे विषाणू असल्याचं यामध्ये निष्पन्न होत असून पण याचं प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी असेल,” असं त्यांनी सांगितलं आहे.
ज्या परिसरांमध्ये संख्या जास्त दिसत आहे ती खरं तर इतकी जास्त नसून सध्या परिस्थिती स्थिर असल्याचं डॉक्टर अग्रवाल यांनी म्हटलं आहे. देशभरात आतापर्यंत डेल्टा प्लस विषाणूचे ४० रुग्ण आढळले आहेत. फैलाव वाढू नये तसंच परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशला इशारा देत काही सूचना केल्या आहेत. डॉक्टर अग्रवाल यांनी यावेळी कोणताही डेल्टा चिंतेचा विषय असणार हे मान्य केलं आहे.
“भारतात असणाऱ्या कोणत्याही डेल्टाबद्दल आपण जास्त चिंता करु नये असं मी सांगत आहे याचा अर्थ आपण तिसऱ्या लाटेची चिंता करण्याआधी दुसरी लाट अद्याप संपलेली नाही याचा विचार आणि काळजी केली पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत.
“पण लोकांनी डेल्टा प्लसमध्ये चिंतीत होण्याचं कोणतंही कारण मला दिसत नाही. डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येणार असल्याचा कोणताही पुरावा नाही,” असं डॉक्टर अग्रवाल यांनी स्पष्ट सांगितलं आहे.