देशात करोनाचा प्रसार अजूनही थांबल्याची चिन्ह नाहीत. दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये करोनाचा प्रसार होतच असून, चाचणी करणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं नाही. करोनाच्या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये ४५०० शुल्क आकारलं जातं. मात्र, आता लवकरच कमी पैशात करोनाचं निदान करणं शक्य होणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) रिलायन्सच्या मदतीनं करोनाचं निदान करणारी किट विकसित करणार आहे. यासाठी दोघांमध्ये करारही झाला आहे.

करोनाचं निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड-१९ टेस्ट किटविषयी (Reverse Transcriptase- loop Mediated Isothermal Amplification)परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी ‘एएनआय’ला माहिती दिली. “कोविड-१९ आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक अॅसिड आधारित आहे. रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचं प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झालं आहे,” असं मांडे यांनी सांगितलं.

“आरटी-लॅम्प टेस्ट ही खूप स्वस्त आहे. कारण त्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी काहीच खर्च नाही. त्याचबरोबर ती जलदगतीनं करता येते. वेगवेगळ्या भागातही करोनाच्या निदानासाठी या चाचणीचा वापर करता येऊ शकतो. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही तातडीनं घेऊन जाऊन शकतो,” असं ते म्हणाले. सीएसआयआरनं मंगळवारी हे जाहीर केलं की, जम्मूतील इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीन आणि रिलायन्स उद्योग एकत्र येऊन करोनाचं निदान करणारी एक नवीन आरटी-लॅम्प किट विकसित करणार आहे. याविषयी बोलताना मांडे म्हणाले,”या नवीन टेस्टिंग किटमुळे चाचणीसाठी शंभर ते दोनशे खर्च येईल. त्याचबरोबर एका तासातच करोना चाचणीचा रिपोर्ट आपल्याला मिळू शकतो,” अशी माहिती मांडे यांनी दिली.

Story img Loader