करोना विषाणू संसर्गाच्या सावटाखाली असलेल्या भारतीयांसाठी चांगली बातमी आहे. ऑक्सफर्ड- अॅमस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि सीरम संस्थेने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशभरात शनिवारी होणाऱ्या लसीकरणाच्या सराव फेरीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली असून आता भारताच्या महाऔषध नियंत्रकांच्या (डीसीजीआय) परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी मिळवणारी ही पहिली लस ठरेल.

लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्याच्या तज्ज्ञ समितीच्या निर्णयामुळे सर्वाधिक लोकसंख्येचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेल्या आणि अमेरिकेपाठोपाठ करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या भारतात लसीकरण मोहीम सुरू होईल. यापूर्वी ब्रिटन आणि अर्जेटिनाने ऑक्सफर्ड लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीपुढे बुधवारी सीरमच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यापैकी ‘सीरम इन्स्टिटय़ूट’च्या लशीला शुक्रवारी तज्ज्ञ समितीने मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार भारताच्या महाऔषध नियंत्रकांनी लशीच्या वापरास अंतिम परवानगी दिल्यानंतर लसीकरण मोहीम सुरू होऊ शकेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ‘फायझर’ने जर्मनीच्या ‘बायोएनटेक’च्या सहकार्याने विकसित केलेल्या लशीच्या परिणामकारकतेची आकडेवारी सादर करण्यासाठी आणखी वेळ मागून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

फायझर लशीला आरोग्य संघटनेची मान्यता

जागतिक आरोग्य संघटनेने करोना प्रतिबिंधक फायझर-बायोएनटेक लशीला आपत्कालीन मान्यता दिली आहे. त्यामुळे ही लस आता गरीब देशांनाही उपलब्ध होणार आहे. या लशीच्या साठवणुकीसाठी अत्यंत कमी तापमानाची गरज असल्याने ती ठेवणार कुठे आणि पोहोचवणार कशी, असा प्रश्न आहे. भारतात काही मोठय़ा शहरांमध्ये या लशीच्या साठवणुकीची व्यवस्था होऊ शकते. युरोप व उत्तर अमेरिकेत या लशीला आधीच मान्यता देण्यात आली आहे.

आजपासून सराव फेरी

देशभर आज शनिवारपासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सराव फेरी होत आहे. महाराष्ट्र आणि केरळ वगळून अन्य राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये तीन ठिकाणी ही सराव फेरी राबवण्यात येईल, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले होते.

पाच कोटी मात्रा तयार

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ संस्थेने ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या पाच कोटी मात्रा तयार केल्या आहेत. या मात्रा शनिवारी लसीकरणासाठी राज्याराज्यांमध्ये शीतपेटय़ांतून पाठवल्या जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात सीरमने मात्र अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.