मुख्य न्यायाधीशांकडून दखल, आज सुनावणी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका दूरवरच्या शहरातील हिंदू समुदायाच्या मंदिरावर हल्ला करून जमावाने मंदिरातील मूर्तींची मोडतोड केली, तसेच मंदिराचा काही भाग जाळून टाकला. मुख्य न्यायाधीश गुलझार अहमद यांनी या हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त व्यक्त केली असून, हे प्रकरण शुक्रवारी न्यायालयापुढे सुनावणीसाठी ठेवले आहे.

लाहोरपासून ५९० किलोमीटरवर असलेल्या रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील गणेश मंदिरावर जमावाने बुधवारी हल्ला केला. हल्लेखोरांजवळ काठ्या, दगड आणि विटा होत्या. त्यांनी धार्मिक घोषणा देत मूर्तींची मोडतोड केली, तसेच मंदिराचा काही भाग जाळला, असे पोलिसांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात ८ वर्षे वयाच्या एका हिंदू मुलाने नजीकच्या मुस्लीम मदरशाच्या वाचनालयात लघुशंका केली होती. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मुलाला गेल्याच आठवड्यात अटक करण्यात येऊन त्याच्यावर ईश्वारनिंदा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अल्पवयीन असल्याने नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. मुस्लीम व हिंदू अनेक दशकांपासून शांततेने राहात असलेल्या भोंगमध्ये या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून जमावाला पांगवले आहे. रेंजर्सना पाचारण करण्यात आले असून त्यांना मंदिराभोवती तैनात करण्यात आले आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेशकुमार वांकवानी यांनी मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडीओ त्यांच्या ट्विटर वॉलवर टाकले. या मंदिराची जाळपोळ व नासधूस थांबवण्यासाठी तात्काळ तेथे पोहोचण्याची विनंती कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना केली. त्यांनी गुरुवारी मुख्य न्यायाधीश अहमद यांची भेट घेऊन त्यांना या हल्ल्याची माहिती दिली. अहमद यांनी या मुद्द्याची गंभीर दखल घेऊन हे प्रकरण शुक्रवारी सुनावणीसाठी इस्लामाबाद येथील न्यायालयात ठेवले.