नवी दिल्ली : भारताने गुरुवारी नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या प्रमुखांना पाचारण केले आणि पंजाब प्रांतातील हिंदू मंदिराची नासधूस करण्याच्या ‘निंदनीय घटनेबद्दल’ निषेध नोंदवला. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर हिंसाचार आणि त्यांच्या धार्मिक छळाच्या घटना अखंडित सुरूच आहेत, असे भारताने लक्षात आणून दिले.

पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आणि त्यांच्या पूजास्थळांवर भयावह प्रमाणात हल्ले होत असताना तेथील सरकार व सुरक्षा यंत्रणा मूक दर्शक बनल्या आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.

पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा, सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करावे, असे आवाहन त्या देशाला करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

‘पाकिस्तानी पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील गणेश मंदिरावर हिंसक जमावाने केलेल्या हल्ल्याचे अस्वस्थ करणारे वृत्त आम्ही समाजमाध्यमांवर पाहिले. जमावाने मंदिरावर हल्ला केला, पवित्र मूर्तींची विटंबना केली आणि मंदिराला आग लावली’, असे बागची यांनी सांगितले. जमावाने या मंदिराच्या परिसरातील हिंदू समुदायाच्या घरांवरही हल्ला केल्याचे ते म्हणाले.