अन्न व औषध प्रशासन व फायजर कंपनीने कोविड १९ लशीची घोषणा मुद्दाम निवडणुकीआधी केली नाही त्यामुळेच आपला पराभव झाला, असा आरोप अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, लशीची घोषणा आधी केली असती तर आपल्याला विजय मिळू शकला असता.

अमेरिकी अन्न व औषध प्रशासन व डेमोक्रॅटस यांनी ‘विजयाची लस’ निवडणुकीआधी मिळू दिली नाही. मी वारंवार लशीसाठी आग्रह धरला होता पण अन्न व औषध प्रशासनाने त्याला विरोध केला होता.

फायजर कंपनीने अलीकडेच केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या कोविड १९ लशीचे परिणाम चांगले दिसत असून ती ९० टक्के प्रभावी आहे.  ट्रम्प यांनी आरोप केला की, जर जो बायडेन अध्यक्ष असते तर अजून चार वर्षे तुम्हाला लस मिळाली नसती. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने त्याला मान्यता दिली नसती. अन्न व औषध प्रशासनानेही लशीची घोषणा आधी केली असती तर राजकीय उद्देश तर साध्य झाला असताच पण हजारो लोकांचे प्राण वाचले असते.

दरम्यान नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी सांगितले की, फायजरची घोषणा आश्वासक आहे त्यातून पुढील वर्षी  बदल दिसतील पण आमच्यासमोरचे काम तेवढेच कठीण आहे. ज्या महिला व पुरुषांनी या लशीसाठी परिश्रम घेतले त्यांचे आपण अभिनंदन करतो.

फायजरच्या लशीचे जॉन्सन यांच्याकडून सावध स्वागत

लंडन : फायजर व बायोएनटेक यांच्या संयुक्त लशीच्या चाचण्यांच्या निष्कर्षांचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सावधपणे स्वागत केले आहे. लशीची ही बातमी आल्याने सर्वानी त्यावर विसंबून राहण्याचे किंवा हुरळून जाण्याचे कारण नाही कारण करोना १९ वरचे उत्तर मग ते लस असो किंवा औषधे अजून फार दूर आहे असे त्यांनी सांगितले. लस किंवा औषधे येण्यास अजून बरेच दिवस लागणार आहेत. ब्रिटनने फायजरच्या लशीचे ४० दशलक्ष डोस विकत घेण्यासाठी आधीच नोंदणी केली आहे.