स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत वास्तव्यास असलेल्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत नेण्यासाठी पुढील पाच-सहा दिवसांत पहिली रेल्वेगाडी सुटण्याची शक्यता आहे. ही गाडी दिल्ली ते भुसावळ अशी धावेल. त्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्ली सरकारला याबाबत पत्र पाठविले आहे. पहिल्या रेल्वेगाडीतून १२०० विद्यार्थ्यांना राज्यात आणले जाईल. त्यापूर्वी दिल्ली सरकार त्यांची वैद्यकीय तपासणी करेल. अशा विद्यार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. दुसरी यादीही तयार केली जात आहे. त्यांच्यासाठीही रेल्वेगाडीची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती राजेश बोनवटे या विद्यार्थ्यांने दिली.

दिल्लीत अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी व नेत्यांशी संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले होते. राज्य सरकारनेही त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला. याबाबत दिल्ली सरकारशी बोलणे झाल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या विद्यार्थ्यांना सांगितले होते.

‘एक खिडकी’ची मागणी

दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, मजूर, पर्यटक आदींना परत जाण्यासाठी राज्याच्या चारही विभागांमध्ये रेल्वेगाडय़ा सोडण्याची गरज आहे. या प्रवाशांच्या सुविधेसाठी दिल्लीत महाराष्ट्र सदनात एक खिडकी मदत यंत्रणा सुरू करावी, अशी विनंती दिल्ली मराठी प्रतिष्ठाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे.