छत्रसाल स्टेडियमवरील सागर राणाच्या हत्येप्रकरणी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुशीलच्या आईने उच्च न्यायालयात मीडिया ट्रायल बंद करण्यासाठी एक याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायालय सुनावणी करणार आहे.

सुशील कुमारची आई कमला देवी यांनी कायद्याचा विद्यार्थी असलेल्या श्रीकांत प्रसादसह ही याचिका दाखल केली. ”सुशील कुमारप्रकरणी मीडिया ट्रायल सुरू आहे. सुशीलने देशासाठी नाव कमावले आहे. पण मीडिया त्याला गुन्हेगार म्हणून सादर करत आहे”, असे सुशीलच्या आईने म्हटले.

हेही वाचा – कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं, सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक

 

सुशील कुमारच्या चार साथीदारांना अटक

छत्रसाल स्टेडियमवर ४ मे रोजी रात्री झालेल्या सागर राणाच्या खून प्रकरणात दिल्ली पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी सुशील कुमारच्या चार साथीदारांना अटक केली. पोलिसांनी चौघांना गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले. भूपेंद्र उर्फ ​​भूपी (वय ३८), मोहित उर्फ ​​भोली (२२), गुलाब उर्फ ​​पहलवान (वय २४) मनजीत उर्फ ​​चुन्नीलाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सागरच्या हत्येनंतर हे चारही आरोपी फरार होते.

न्यायालयाने या सर्वांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. घटनेच्या दिवशी पकडण्यात आलेला प्रिन्स दलाल हा त्यांचा साथीदार होता. अटकेनंतर आरोपींनी सुशीलच्या सांगण्यावरून सर्व जण छत्रसाल स्टेडियमवर पोहोचल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्रविरुद्ध ९, मोहितविरुद्ध ५, गुलाबविरुद्ध २ आणि मनजीतविरूद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

योग्य तपास व्हावा – सागर राणाचे आई-वडील

पीडित सागर राणाच्या कुटुंबाने याप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी मागणी केली असून सुशील कुमारला कठोर शिक्षा केली जावी अशा शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखींच्या माध्यमातून तपासावर प्रभाव पाडू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हत्येप्रकरणी कोर्टानेही तपास करावा जेणेकरुन सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखी वापरत पोलीस तपासात अडथळा आणणार नाही अशी मागणी सागर राणाचे वडील अशोक यांनी केली आहे. सागर राणाच्या आईनेही संताप व्यक्त केला असून गुरु म्हणण्याची त्याची पात्रता नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – ‘लक्षवेधी’ बैठकीसाठी आज मुंबईत येणार BCCIचा ‘बॉस’!