दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर सागर धनकर नावाच्या युवा कुस्तीपटूची हत्या झाल्याप्रकरणी भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमार सध्या अटकेत आहे. मात्र, अटकेत असतानाही त्याच्याभोवतीचं प्रसिद्धीचं वलय काही कमी होताना दिसत नाहीये. शुक्रवारी सुशीलकुमारला मंडोली तुरुंगातून तिहार जेलमध्ये हलवण्यात आलं. यावेळी मंडोली तुरुंगाबाहेर दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसोबत काढलेले फोटो आणि सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटोसेशन आता पोलिसांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सेल्फी आणि फोटोसेशन!

कुस्तीपटू सागर धनकार हत्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सुशील कुमारला ९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुशील कुमारला दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून तिहार जेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मंडोली तुरुंगाबाहेर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवताना दिल्ली आर्म्ड पोलिसांच्या थर्ड बटालियनच्या पोलिसांनी सुशील कुमारसोबत फोटोसेशन केलं. काही अधिकाऱ्यांनी त्यावेळी सुशील कुमारसोबत सेल्फी देखील काढले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेतला जाऊ लागला.

‘‘ऑलिम्पिकमध्ये चाललायस की जेलमध्ये?”, पोलिसांसोबतच्या फोटोवरून सुशील कुमार ट्रोल!

वरीष्ठांसोबतच नातेवाईकांनाही पाठवले फोटो!

सुशील कुमारला असलेला धोका लक्षात घेता त्याच्यासोबत सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथक देखील तैनात असतं. मात्र, हे पथक मांडोलीला पोहोचल्यानंतर त्यांनी आरोपीसोबत (सुशीलकुमार) फोटो काढण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबतच्या थर्ड बटालियनच्या पोलिसांना अशा प्रकारच्या हाय रिस्क कैद्यांचे फोटो काढून त्यांच्या वरीष्ठांना पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणं शक्य होतं. मात्र, शुक्रवारी त्याच्यासोबतच्या पोलिसांनी त्याच्यासोबतचे फोटो वरीष्ठांना पाठवण्यासोबतच ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे हा प्रकार समोर आला असून त्याच्या अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सुशील कुमारचे फोटो पाहून नेटिझन्स म्हणतात…

दरम्यान, सुशील कुमारसोबत दिल्ली पोलिसांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी देखील त्याला ट्रोल केलं होतं. काही नेटिझन्सनी त्याला जेलमध्ये विशेष उपचार दिले जात आहेत का? तो जेलमध्ये जातोय की ऑलिम्पिकमध्ये? असे प्रश्न देखील उपस्थित केले.