नवी दिल्ली : भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे.
डेल्टा प्लस अर्थात एवाय.१ हा करोनाचा विषाणू भारतात सध्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्याची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या नव्या प्रकारामुळे करोनाची लागण कितपत तीव्र असू शकते, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, हा प्रकार मोनोक्लोनल प्रतिपिंड मिश्रण या करोनावरील उपचारांना दाद देत नाही. भारतामध्ये अलीकडे याच उपचारपद्धतीला मान्यता देण्यात आलेली आहे.
दिल्लीतील सीएसआयआर-इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) संस्थेचे शास्त्रज्ञ यांनी रविवारी याबाबत ट्वीट केले आहे. करोनाना हा नवा विषाणू के४१७ एन उत्परिवर्तनातून तयार झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नवे उत्परिवर्तन हे सार्स-कोव्ही-२ च्या स्पाईक प्रोटीनमधील बदलाने झाले आहे. हे प्रथिन विषाणूला मानवी पेशीत शिरकाव करण्यासाठी मदत करते.
‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टामध्ये (बी.१.६१७.२) के४१७ एन उत्परिवर्तन झालेले ६३ जिनोम आतापर्यंत दिसून आले आहेत.