लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संघर्षांच्या ४ ठिकाणांपैकी पँगाँग त्सो आणि गोग्रा येथील गस्ती चौक १७ ए येथून आणखी मागे जाण्यास चिनी सैन्य अनुत्सुक आहे. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी भारत – चीन यांच्या लष्करी कमांडरची पुढील आठवडय़ात पुन्हा चर्चा होऊ शकते, असे लष्करातील एका उच्चपदस्थ सूत्राने गुरुवारी सांगितले.
विशेषत:, जेथे प्रत्यक्ष ताबा रेषेवरील वस्तुस्थिती आणि दावे यांच्याबाबत काही मतभेद उद्भवले आहेत त्या पँगाँग त्सो येथील परिस्थितीबाबत लष्करी किंवा राजनैतिक चर्चेची आणखी एक फेरी होण्याची आवश्यकता भासत असल्याचे हे सूत्र म्हणाले. फौजा माघारी घेणे आणि तणाव कमी करणे याबाबतची प्रक्रिया ‘सध्यापुरती थांबली आहे’, असेही त्याने सांगितले.
‘वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड को-ऑर्डिनेशन ऑन इंडिया- चायना बॉर्डर अफेअर्स’ ची (डब्ल्यूएमसीसी) आणखी एक बैठक लवकरच होण्याची अपेक्षा आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही गुरुवारी सांगितले.