द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) सर्वेसर्वो आणि तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने चेन्नई येथील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कावेरी रूग्णालयाने पत्रक प्रसिद्ध करून सायंकाळी ६.१० वाजता करूणानिधी यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. पण वयोमानामुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळू शकला नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, त्यांना उपचारासाठी दाखल केल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.  राज्यात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात होती. अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या ही केली होती. आपल्या राजकीय कारकिर्दीत एकूण ५ वेळा ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. तसेच २७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती.

पटकथा लेखक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. तामिळ भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळे ते चित्रपटांसाठी पटकथा लिहीत असत. त्यानंतर  राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पाहता पाहता तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. पेरियार व अण्णा दुराई यांच्याकडून करुणानिधी यांना राजकारणातील धडे मिळाले. गेले काही वर्षे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यातच त्यांच्या राजकीय विरोधक अण्णा द्रमुक प्रमुख जयललिता यांचे २०१७ मध्ये निधन झाले.

तामिळ संस्कृती आणि द्रविडी अभिमान यावर द्रमुकची पायाभरणी झाली. पण हिंदीविरोधी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात ओळख दिली. केवळ सामाजिक कार्यामध्ये समाधान मानणाऱ्या पक्षाला १९५६च्या सुमारास लोकाग्रहास्तव निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरावे लागले. १९६७ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला आणि दोन वर्षातच करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या सरकारने कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना भक्कम करणे असे काही महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.