पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या वरीष्ठ नेत्यांसमोर भाषण करताना त्यांना लोकांशी नाळ अधिक घट्ट करण्याचा सल्ला दिला आहे. “एखाद्या राजासारखे होऊ नका. जमीनीशी नातं असणारा नेता व्हा,” असा सल्ला मोदींनी नेत्यांना दिला आहे. द प्रिंटने दिेलेल्या वृ्त्तानुसार पंतप्रधान मोदींनी सर्व नेत्यांना पक्ष कार्यकर्त्यांशी अहंकाराने वागू नये असा सल्ला दिलाय. या कार्यकर्त्यांनीच तुम्हाला नेता बनवलं आहे याची आठवही मोदींनी नेत्यांना करुन दिलीय. तसेच सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू असल्याचेही मोदींनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे.

रविवारी पंतप्रधान मोदींनी भाजपाचे नेते, राज्यातील प्रभारी, अध्यक्ष आणि सचिवांची बैठक घेतली. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी अनेक नेत्यांना आपल्या भाषणातून अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे मत अनेक नेत्यांनी वक्त केलं. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला तोंड देताना तेथील स्थानिक भाजपा नेतृत्व संवाद साधण्यात आणि आपलं म्हणणं मांडण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत असल्याने मोदींनी हा इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ भाजपा नेत्याने दिल्ल्या माहितीनुसार पंतप्रधांनांनी या तिन्ही शेती कायद्यांचे काय फायदे होणार आहे हे नेत्यांनी जनतेपर्यंत पोहचवावं, असं आवाहन केलं आहे.

“पंतप्रधान मोदींनी किमान ४० मिनिटं भाषण केलं. मात्र हे सामान्य भाषणापेक्षा नेत्यांशी थेट संवाद साधल्याप्रमाणे करण्यात आलेली चर्चा ठरली. तळागाळातील कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे त्यामुळे नेत्यांनी त्यांच्याशी जोडलेलं रहावं अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली,” अशी माहिती बैठकीला उपस्थित असणाऱ्या एका वरिष्ठ भाजपा नेत्याने दिली. पंतप्रधान मोदींनी सर्व नेत्यांना अधिक नम्र, सर्वसमावेशक आणि कधीही संपर्क होऊ शकतो अशापद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचा सल्ला दिला. “पक्षाच्या नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांबद्दल उद्धट वर्तन करु नये. तसेच या कार्यकर्त्यांना वरचे वर भेटावे ज्यामुळे एकप्रकारचा साकारात्मक संदेश त्यांच्यात जातो. नेत्यांनी आपल्या कार्यालयांमध्ये बसून राहू नये. त्याऐवजी रस्त्यावर उतरुन थेट कार्यकर्त्यांशी, जनतेशी जास्तीत जास्त संवाद साधावा,” असा सल्ला मोदींनी दिल्याची माहिती भाजपा नेत्यांनी दिली.

वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भातील खोटी माहिती आणि अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणावर काम करावे, अशी इच्छाही मोदींनी व्यक्त केली. “सत्ता मिळवणे हा भाजपा उद्देश नसून लोकांची सेवा करणे हा आहे. देशाच्या प्रगतीसाठी काम करणे हे भाजपाचे ध्येय आहे,” असं मोदी म्हणाल्याचे भाजपा नेते सांगतात. आर्थिक आणि कृषीविषयक नवीन धोरणाच्या माध्यमातून सरकारने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्वावर काम सुरु केल्याचेही मोदींनी म्हटलं. “नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी जोडलेलं रहावं, हा पंतप्रधानांनी दिलेला एक सामान्य संदेश आहे. ते अनेकदा अशाप्रकाराचा संदेश देतात. आपण उगाच याचा वेगळा अर्थ काढू नये,” असं मत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आर. पी. सिंग यांनी व्यक्त केलं आहे.