जम्मूतील हवाई दलाच्या तळावर बॉम्बस्फोट, दोन अधिकारी जखमी

जम्मू : दहशतवाद्यांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून रविवारी पहाटे जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर बॉम्बहल्ला केला. त्यांच्या स्फोटात हवाई दलाचे दोन अधिकारी जखमी झाले.

पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी अत्यावश्यक आस्थापनांवर हल्ले करण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. हा ड्रोन हल्ला रविवारी पहाटे १.४० च्या सुमारास झाला.  हवाई दलाच्या तळावर ड्रोनद्वारे सहा मिनिटांच्या अंतराने दोन बॉम्ब टाकण्यात आले. पहिल्या बॉम्बस्फोटात उच्च संरक्षणव्यवस्था असलेल्या तांत्रिक विभागातील एकमजली इमारतीचे छत उद्ध्वस्त झाले, तर दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाला. हवाई दलाचे हे केंद्र शहराच्या सतवारी भागात आहे.

हा दहशतवादी हल्ला असल्याचे जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी सांगितले, तर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए ) आणि हवाई दलानेही हा दहशतवादी हल्ला असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. हवाई दल तळाच्या तांत्रिक भागात झालेले स्फोट कमी तीव्रतेचे होते, असे भारतीय हवाई दलाने ट्वीट संदेशाद्वारे स्पष्ट केले. एका स्फोटामुळे इमारतीच्या छप्पराचे किरकोळ नुकसान झाले, तर दुसरा स्फोट मोकळ्या जागी झाला. त्यात कोणत्याही उपकरणाची हानी झाली नाही, असे हवाई दलाने म्हटले आहे.

या हल्ल्यामागील कटाचा उलगडा करण्याचे काम पोलीस आणि अन्य तपाससंस्था हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसह करीत आहेत. एनआयचे पथकही घटनास्थळी आहे.

ड्रोन नेमके कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आले, हे लगेचच स्पष्ट झाले नसले तरी ते  त्यांचा मार्ग काय याबाबतचा तपास सुरू आहे. ड्रोन सीमेपलिकडून आले असतील तर जम्मू विमानतळापासून १४ किमी हवाई अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बसवलेल्या अत्याधुनिक रडार यंत्रणेच्या नजरेतूनही ते कसे सुटले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी स्फोटके टाकून ड्रोन पुन्हा सीमेपलिकडे गेले असावेत किंवा अन्य एखाद्या स्थळी उतरले असावेत, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ड्रोनचा माग काढण्यासाठी तपास अधिकारी विमानतळाच्या संरक्षक भिंतींवर लावलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणासह अन्य ठिकाणचे चित्रणही तपासत आहेत. ड्रोन कोठून आले, याचा शोध घेतला जात आहे. परंतु सर्व सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या कडेला असल्याने त्यातून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता धूसर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या हल्ल्याच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्यासाठी स्फोटके घेऊन आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे सहा किलो स्फोटके सापडली आहेत.

पंजाब सीमेवरून पाकिस्तानी दहशतवादी नेहमीच स्फोटके आणि शस्त्रांनी भरलेले ड्रोन विमाने पाठवत असतात. तसे अनेक प्रयत्न यापूर्वी हाणून पाडण्यात आले होते. जम्मू विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय सीमा यांच्यातील अंतर १४ कि.मी आहे. दोन्ही ड्रोनचा हवाई मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जम्मू विमानतळ हा नागरी विमानतळ असून त्याची धावपट्टी आणि हवाई वाहतूक नियंत्रण विभाग भारतीय हवाई दलाच्या ताब्यात आहे. जम्मू विमानतळाचे संचालक प्रवत रंजन बेउरिया यांनी सांगितले, की स्फोटांमुळे विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. जम्मू विमानळावरून हवाई वाहतूक सुरू आहे.

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (युएपीए) गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास आता ‘एनआयए’ करण्याची शक्यता आहे.

संरक्षणमंत्र्यांची हवाई दल उपप्रमुखांशी चर्चा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले, की आपण हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल ए.एस अरोरा यांच्याशी चर्चा केली आहे. राजनाथ सिंह यांनी एअर मार्शल एच. एस. अरोरा यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर एअर मार्शल विक्रम सिंह यांना घटनास्थली पाठवण्यात आले आहे. हवाई दलप्रमुख एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरिया यांना या घटनेची माहिती देण्यात आली. ते बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत.

ड्रोन आले कोठून?

जम्मू विमानतळापासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंतचे हवाई अंतर १४ किमी आहे. सीमाभागात शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक रडार बसवण्यात आले आहेत. एखाद्या पक्षाएवढय़ा लहान आकाराचा ड्रोनही शोधणारी ही वेगळ्या प्रकारची रडार यंत्रणा आहे. मात्र ती ड्रोन शोधू शकली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

*रविवारी पहाटे १.४० वाजता दोन बॉम्बस्फोट

* दोन स्फोटांमध्ये सहा मिनिटांचे अंतर

* पहिला स्फोट इमारतीच्या छतावर

* दुसरा स्फोट मोकळ्या जागेवर

* स्फोटासाठी वापरलेली स्फोटके कमी शक्तिशाली

* हवाई दलाचे दोन अधिकारी किरकोळ जखमी

* स्फोट घडवण्यासाठी प्रथमच ड्रोनच्या वापराचा संशय