वायू वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या विषाणूमुळे केवळ आरोग्य व्यवस्थाच तणावाखाली आलेली नाही, तर नागरिकांच्या मनात भीती घर करताना दिसत आहे. अनेक नागरिकांना करोनामुळे मानसिक ताणतणाव जाणवत असल्याचं अनेक अहवालातून समोर आलं आहे. दरम्यान, गुजरातमध्ये अशीच एक घटना घडली आहे. करोनामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर महिलेनं आपल्या दोन मुलांसह विष घेऊन जीवन संपवलं आहे.

गुजरातमधील द्वारका शहरात ही घटना घडली आहे. श्रीकृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्वारकेत करोनानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतला आहे. शहरातील रहिवासी जयेशभाई जैन (६०) हे नाश्त्याचं दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. ते पत्नी साधनाबेन जैन (५७) आणि कमलेश (३५) व दुर्गेश (२७) यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते.

आणखी वाचा- दिल्ली : स्मशानभूमीत सतत जळणाऱ्या चितांमुळे होऊ लागला त्रास; राहती घरं सोडून स्थानिकांचं स्थलांतर

जयेशभाई जैन यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला. शुक्रवारी त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी टोकाचं पाऊल उचललं. जयेशभाई यांच्यावर शुक्रवारी सकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर पत्नी आणि दोन्ही मुलं घरी परतली.

घरी परतल्यानंतर तिघांनीही विषारी द्रव्ये प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचंच करोनानं निधन झाल्यानं तिघांनाही धक्का बसला होता. त्या तणावातच तिघांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक पी.बी. गढवी यांनी दिली.

आणखी वाचा- देशात करोनाचा रौद्रावतार ! २४ तासांत चार हजारांहून जास्त मृत्यू, आत्तापर्यंतचा उच्चांक!

जयेशभाई हे मुळचे अमरेली जिल्ह्यातील असून, ते द्वारकेमध्ये भाड्याच्या घरात कुटुंबियांसह राहायचे. जयेशभाई हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना हा धक्का सहन झाला नाही. अती दुःख आणि तणावातून तिघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणाची पुढील तपास केला जात आहे, असंही गढवी म्हणाले.

सकाळी ६ वाजता अंत्यसंस्कारवरून तिघेही घरी परतले. त्यानंतर तिघांनी विष प्राशन केलं. दूध टाकणारी व्यक्ती जेव्हा घरी आली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. घराचा दरवाजा उघडा असल्याचं दूधवाल्याच्या निदर्शनास आलं. कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे मृतदेह जमिनीवर पडले होते. त्यानंतर लगेच त्याने ही माहिती पोलिसांना देण्यात दिली आणि त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले.