कुटुंबीय, एल्गार परिषद प्रकरणातील सहकाऱ्यांचा आरोप

नवी दिल्ली : शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचा मृत्यू ही यंत्रणेने घडविलेली हत्या असून कारागृहे, विविध न्यायालये आणि मत्सरी तपास यंत्रणांचा निष्काळजीपणा त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत, असा आरोप मंगळवारी स्वामी यांचे कुटुंबीय आणि एल्गार परिषद प्रकरणातील अन्य आरोपींनी केला.

स्वामी यांच्यासारख्या प्रकृती ठीक नसलेल्या वृद्धाला साथरोगाच्या काळात कारागृहात ठेवणे गैरवाजवी होते, असे या आरोपींनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे. इतकेच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्य आणि कारागृहातील सहकारी यांच्यावरही कारागृहात स्वामी यांच्यासारखाच अन्याय केला जात आहे, असेही या आरोपींनी म्हटले आहे.

स्वामी यांच्या निधनाने आम्हाला अतीव वेदना झाल्या आहेत, स्वामी यांचा मृत्यू नैसर्गिक नाही तर तो यंत्रणेने घेतलेला बळी आहे, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. स्वामी यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ऑक्टोबर २०२० मध्ये रांचीतून अटक केली आणि त्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात केली.

मुंबईत दफनविधी

मुंबई : जामीन याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असतानाच शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवारी वांद्रे  येथील पीटर चर्च येथे त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला.

यावेळी अन्य चर्चचे पाद्री, वकील, मानवाधिकार कार्यकर्ते आणि स्वामी यांचे सहकारी उपस्थितीत होते. स्वामी यांच्या आठवणी, कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला. १९७० मध्ये स्वामी झारखंड येथील आदिवासींच्या सेवेसाठी निघून गेले आणि तेथेच रमले.  तेथील आदिवासींच्या सेवेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते.

‘‘अटक झाली त्यावेळी आपण निरोगी होतो. परंतु कारागृहातील वास्तव्यात आपली प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. प्रत्येक कामासाठी मदतनीसाची गरज भासू लागली. जे. जे. रुग्णालयात दाखल होण्याऐवजी आपण कारागृहातच मरणे पसंत करू. परंतु जामीन मंजूर झाल्यास झारखंड येथे जाऊन सहकाऱ्यांसोबत आयुष्याची सायंकाळ व्यतीत करायची आहे’’, असे त्यांनी न्यायालयात सांगितले होते.

त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी प्रलंबित असताना सोमवारी त्यांचे निधन झाले.