आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी परिवारात कौटुंबिक कलहाचा भडका उडाला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील बेबनाव यासाठी निमित्त ठरला आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या सूचनेनुसार मंगळवारी शिवपाल यादव यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी तडकाफडकी शिवपाल यादव यांच्याकडील पदभार काढून घेतला आणि यादव कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला. त्यामुळे आता उत्तरप्रदेशच्या  राजकारणात वडील-काका विरुद्ध मुलगा असे दोन तट निर्माण झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या वादाचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
…तर आमच्यात मैत्री होईल, राहुल गांधींबद्दल अखिलेश यादवांचे सूचक वक्तव्य
अखिलेश यादव यांनी मंगळवारी राज्याच्या मुख्य सचिवपदावरून दिपक सिंघल यांची उचलबांगडी केली होती. दिपक सिंघल हे शिवपाल यादव यांचे निकटवर्तीय मानले जात असून त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच पदभार स्विकारला होता. त्यामुळे त्यांच्या तडकाफडकी उचलबांगडीने राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष वेधले गेले. दिपक सिंघल यांना सध्या यांना पुढच्या आदेशाची वाट पाहण्यास सांगितले असून त्यांच्याजागी वित्त खात्याचे सचिव राहुल भटनागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या आदेशानंतर शिवपाल यादव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम , सिंचन, सहकार, पूर नियंत्रण, जमीन विकास व जलसंपदा, पडीक जमीन विकास, महसूल, आपत्ती निवारण आणि पुनर्वसन आणि सार्वजनिक सेवा व्यवस्थापन ही सर्व खाती तडकाफडकी काढून घेतली. राज्यपालांद्वारे यासंदर्भातील आदेश काढून ही खाती अन्य मंत्र्यांकडे सोपविण्यात आली, तर अखिलेश यादव यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्वत:कडे ठेवून घेतले आहे. तत्पूर्वी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आरोपी मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली होती. अखिलेश यादव यांनी सोमवारी तासाभराच्या कालावधीत दोन कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून नारळ दिला. यामध्ये खाणकाम मंत्री गायत्री प्रजापती आणि पंचायतराज मंत्री राजकिशोर सिंग यांचा समावेश आहे. यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप होते. या सर्व घडामोडींमुळे समाजवादी पक्षात असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत.
यूपी सरकारच्या मंत्र्यांनी नाश्त्यावर खर्च केले ९ कोटी रूपये
यापूर्वी २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांना प्रदेशाध्यक्ष बनवले होते. या पार्श्वभूमीवर यावेळी शिवपाल यादव यांची प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आलेली नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या नियुक्तीमुळे आगामी काळात उमेदवार निवडीपासून पक्षाच्या प्रत्येक निर्णयात शिवपाल यादव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
गेल्या काही काळात पक्षातील मुलायमसिंह यादव यांच्या निकटवर्तीयांच्या गच्छंतीची भरपाई म्हणून शिवपाल यादव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही नियुक्ती झाल्याचीही चर्चा आहे. आगामी काळात शिवपाल यादव हे पक्षाची तर अखिलेश यादव सरकारची सूत्रे सांभाळतील अशी रणनीती आहे. मात्र, यानिमित्ताने शिवपाल यादव समाजवादी पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर शिवपाल यादव समाजवादी पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुलायमसिंह यादव यांची भेट घेतल्यानंतरच आपण राजीनाम्याचा निर्णय घेऊ, असे शिवपाल यादव यांनी स्पष्ट केले आहे.
अखिलेश यादव यांच्याकडून तासाभरात दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ‘नारळ’