नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने बुधवारी खतावरील(डीएपी) अनुदान १४० टक्क्यांनी वाढवले. परिणामी खतांच्या जागतिक किमतीत फार मोठी वाढ झालेली असूनही शेतकऱ्यांना ती जुन्या दरानेच उपलब्ध होतील. यामुळे सरकारी खजिन्यावर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खतांच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्रीय रसायने व खतमंत्री सदानंद गौडा यांना पत्र पाठविले होते. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला.

‘शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करण्यास सरकार वचनबद्ध आहे. त्यामुळे जागतिक किमतींमध्ये वाढ होऊनही त्यांना खते जुन्याच दराने उपलब्ध करून देण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. युरियानंतर डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) हे देशात सर्वात जास्त वापरले जाणारे खत आहे. ‘डीएपी खतांवरील अनुदान प्रतिबॅग ५०० रुपयांवरून १२०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना यापुढेही डीएपीची बॅग १२०० रुपयांनाच मिळेल,’ असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.