लोककलेला नवा साज चढवून मराठी माणसाच्या मनाला भुरळ घालणारे लोककलावंत छगन चौघुले यांचं आज निधन झालं. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

छगन चौगुले यांच्या ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचं काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ या ध्वनिमुद्रिका विशेष गाजल्या. पण ‘खंडेरायाच्या लग्नाला, बानू नवरी नटली’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचे हे गाणे आजही अनेक हळदी समारंभात किंवा कॉलेजमधील कार्यक्रमामध्ये ऐकायला मिळतं. लोककलेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील श्रोत्यांची मनं जिंकणारा कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

छगन चौगुले यांनी लोककलेचे कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. तरीही स्वयंःकौशल्याच्या जोरावर लोककलावंत म्हणून ते लोकप्रिय झाले. ते मुळात गोंधळी असल्यामुळे त्यांनी सुरुवात जागरण गोंधळाच्या कार्यक्रमापासून केली. परंतु, केवळ त्यावरच न थांबता त्यांनी स्वत:तील कलेला व्याप्त स्वरुप दिलं.

Story img Loader