संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे डीआरडीओने विकसित केलेल्या अस्त्र मिसाइलमुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. अस्त्र हे एअर टू एअर हल्ला करणारे मिसाइल आहे. मंगळवारी इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-३० एमकेआय या अत्याधुनिक फायटर विमानामधून ‘अस्त्र’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सुखोईमधून डागण्यात आलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राने हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
काय आहे अस्त्र क्षेपणास्त्राची वैशिष्टये
– अस्त्र हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पहिले बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे दृष्टीपलीकडचा लक्ष्यभेद करणारे एअर तो एअर मिसाइल आहे.
– अस्त्र ताशी ५,५५५ किलोमीटर वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावते.
– अस्त्रमध्ये ७० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.
– अस्त्र १५ किलोपर्यंत वॉरहेड म्हणजे स्फोटके वाहून नेऊ शकते.
– अस्त्रची रचनाच लघु आणि दीर्घ पल्ला तसेच वेगवेगळया उंचीवरील लक्ष्यभेदण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.
– अस्रची सुखोई-३० एमकेआयमधून चाचणी करण्यात आली असली तरी मिराज-२००० आणि मिग-२९ विमानांमध्येही हे मिसाइल बसवण्यात येईल.
– डीआरडीओने अस्त्रची निर्मिती ५० अन्य सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने केली आहे.
– सुखोईला अस्त्र मिसाइलने सुसज्ज करण्यासाठी एचएएलने या फायटर विमानामध्ये काही बदल केले आहेत.
– भविष्यात अस्त्रचा पल्ला ३०० किलोमीटरपर्यंत करण्याची डीआरडीओची योजना आहे.
Air-to-Air missile Astra successfully flight tested from Su-30 MKIhttps://t.co/okTopB4TBv pic.twitter.com/Ep9xXaVfeG
— DRDO (@DRDO_India) September 17, 2019
बालाकोट एअर स्ट्राइकनंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमानांबरोबर झालेल्या डॉगफाइटमध्ये पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांनी अॅमराम मिसाइल्स डागले होते. अॅमराम ही बियाँड व्हिज्युअल रेंज मिसाइल्स असल्याने पाकिस्तानी विमानांनी ४० ते ५० किलोमीटर अंतरावरुन ही मिसाइल्स डागली होती. सुखोई आणि मिग-२१ बायसन विमाने अॅमरामचे मुख्य लक्ष्य होते. पण आपल्या वैमानिकांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत या मिसाइल्सचा निशाणा चुकवला.
आता अस्त्र मिसाइल्समुळे भारतालाही दूर अंतरावरुन शत्रूच्या फायटर विमानाचा अचूक वेध घेता येईल.