देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. पेट्रोलियम कंपन्या दररोज दर वाढवत आहेत. वाढत्या दराच्या परिणामामुळे जनता त्रस्त आहे. दरम्यान, डिझेल आणि पेट्रोलचे दर अद्याप कमी करता येणार नाहीत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले, ते गुजरात दौऱ्यावर होते.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील का? असा प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांना केला असता. ते म्हणाले, “सरकारचे उत्पन्न बरेच कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान उत्पन्न कमी राहिले आणि २०२१-२२ मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे तेलाचे दर आता कमी करता येणार नाहीत”

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आरोग्य क्षेत्रातील खर्च वाढला आहे. कल्याणकारी कामांमध्येही सरकार खर्च करीत आहे. वाढलेला खर्च आणि घटलेले उत्पन्न पाहता पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही. तसेच यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेतही त्यांनी दिले.

हेहा वाचा- देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार

पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीमागील मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली वाढ आहे, असे पेट्रोलियम मंत्री यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७० डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. म्हणूनच डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत.

दरम्यान, आजही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. दिल्लीत डिझेलच्या दरात २७ पैसे आणि पेट्रोलमध्ये २८ पैशांनी वाढ झाली आहे. एक दिवस आधी म्हणजेच ६ जून रोजीही पेट्रोलचे दर २७ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैसे वाढ झाली होती. मुंबईत पेट्रोल १०१.५२ रुपये आणि डिझेल ९३.९८ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.