हा मजकूर वाचून होईपर्यंत अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचा ‘निकाल’ बहुधा लागलेला असेल. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या लढतीची परिणती नक्की काय आणि कशी होणार याचं चित्र स्पष्ट झालेलं असेल.

याचं कारण रविवारी रात्री.. आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे.. झडलेली अध्यक्षीय चर्चेची दुसरी फेरी आणि तिच्या आधी दोन दिवस डोनाल्ड ट्रम्प यांनी तोडलेले तारे. शुक्रवारी इकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकानं डोनाल्ड ट्रम्प यांची उरलीसुरली अब्रू चव्हाटय़ावर आणली. या ट्रम्प यांनी २००५ साली एका रेडिओ निवेदकाला दिलेल्या मुलाखतीचा मजकूर ‘पोस्ट’नं छापला. या मुलाखतीचं प्रक्षेपण होत नसताना आणि तरीही ध्वनिक्षेपक लावलेला असताना ट्रम्प खासगीत जे काही बरळले त्याचा हा तपशील आहे.

आहे म्हणजे जे काही कोणी बोलायला नको ते सर्व यात आहे. आपल्या खासगी लैंगिक चाळ्यांचं वाह्य़ात वर्णन ट्रम्प या चर्चेत करतात. मी कसा महिलांना वश करतो, मला त्या कसं काहीही करू देतात, एका महिलेचा शय्यासोबतीसाठी मी कसा पाठपुरावा केला, मग ती विवाहित निघाल्यावर माझी कशी पंचाईत झाली, सामूहिक शरीरभोग, स्त्रियांचा देहाकार.. इतकंच काय पण स्वत:च्या पोटच्या मुलीच्या देहाचं वर्णन.. असं कोणतीही किमान सभ्यता असलेली व्यक्ती डोकं जागेवर असताना कधीही, काहीही बोलणार नाही, असं सगळं ट्रम्प बोललेत. बरं ते सगळे स्वानुभव. म्हणजे नुसतंच बोललेत असंही नाही.

‘वॉशिंग्टन पोस्ट’नं हे छापल्यानंतर ‘सीएनएन’नंही काही खोदकाम करून ट्रम्प यांच्यावर अधिक डांबर ओतायची व्यवस्था केली. याचा परिणाम इतका भीषण झालाय की भारतात कल्पनाही येणार नाही. खुद्द रिपब्लिकन नेत्यांनाच वाटू लागलंय की ट्रम्प यांनी आता मुकाट अध्यक्षीय निवडणुकीतनं माघार घ्यावी. मॅकेनसारख्या त्या पक्षाच्या ज्येष्ठांनी ट्रम्प यांचा जाहीर धिक्कार केलाय आणि अशी व्यक्ती आपल्या पक्षाची उमेदवार आहे, याची किती लाज वाटते ते उघड नमूद केलंय. इतकंच काय, ट्रम्प यांची तूर्त तिसरी आणि विद्यमान पत्नीनंही त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीये. मला माहीत असलेला डोनाल्ड हा असा नव्हता, असं श्रीमती ट्रम्प म्हणाल्यात. या वादळात ट्रम्प यांच्यापाठीशी आंधळ्या भक्तीत उभे आहेत ते रूडी गुलियानी हे न्यूयॉर्कचे माजी महापौर. त्यांचं म्हणणं क्लिंटन.. म्हणजे बिल.. यापेक्षाही वाईट बोलायचे. वर हे गुलियानी असंही म्हणालेत.. त्या बाईपेक्षा अध्यक्षपदासाठी ट्रम्प बरे.

म्हणजे यातूनही उलट रिपब्लिकनांचा महिलांविषयीचा अनुदार दृष्टिकोनच दिसतो. हे रिपब्लिकनांचं वैशिष्टय़. धर्माभिमानी. पारंपरिक आणि इतिहासाच्या घडय़ाळाचे काटे उलटे फिरवू पाहणारे सनातनी. यांना महिलांना गर्भपाताचा अधिकार नको आहे, यांचा समलिंगी संबंधांना विरोध आहे, आणि इतकंच काय स्कंधपेशी (स्टेम सेल) संशोधनसुद्धा यांना नकोय. या पक्षाचे देशभरातरे नेते असेच सनातनी आहेत. त्या पक्षाच्या एका नेत्याच्या सभेत त्याचा मोबाइल फोन वाजला तर तो म्हणाला.. ख्रिस्ताचा फोन आहे आणि ते ऐकून समोर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. एव्हांजेलिकल म्हणून ओळखले जाणारे शंभर टक्के या पक्षाच्या पाठीशी आहेत. आफ्रिकी, आशियाई, इस्लामी आणि त्या बरोबर महिला या आपल्या बरोबरीला येउ शकतात हे या मंडळींना मान्यच नाही, इतके ते मागास आहेत. त्या बाईपेक्षा ट्रम्प परवडले.. या गुलियानी यांच्या उद्गारांतून हीच मानसिकता प्रकट होते. ही मंडळी महिलांनी महिन्यातनं चार दिवस ‘विटाळ’ पाळावा असं अधिकृतपणे म्हणत नाहीत इतकंच. एरवी ते आपल्याला ओळखीचे वाटावेत असेच सनातनी आहेत.

तेव्हा इतकं सारं झाल्यावर ट्रम्प यांच्या विरोधात महिलावर्ग चवताळून उठला नसता तरच नवल. देशभरात त्यांच्या विरोधात अक्षरश वातावरण तापलेलं आहे. इतकं की ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमांतल्या महिलांनी आपलं काम सोडून द्यायला सुरुवात केलीये. अमेरिकेत महिला मतदारांचं प्रमाण ५३ टक्के इतकं आहे. तेव्हा इतक्या मोठय़ा वर्गाला ट्रम्प यांनी दुखावलंय. यातल्या सगळ्या,  किंवा बहुतांश देखील, या डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्या जराही समर्थक नाहीत. त्यांच्याविषयी त्यांना तीळमात्रही आदर नाही. परंतु ट्रम्प यांच्या या भयानक विधानांनी हा मतदारवर्ग हिलरी क्लिंटन यांच्याकडे झुकू लागलाय. हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार माईक पेन्स यांनी तर ट्रम्प यांच्या बरोबरीच्या सभासुद्धा रद्द केल्यात. माझ्या मुलींचा पिता, एक पती या भूमिकेतनं मला लाज वाटते ट्रम्प जे काही बरळलेत त्या विषयी, असं पत्रकच पेन्स यांनी प्रसृत केलंय.

तेव्हा आता या पेन्स यांनाच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार म्हणून जाहीर करावं, अशी टूम रिपब्लिकन पक्षात निघालीये. नाहीतरी ट्रम्प यांच्या तुलनेत संयत, समंजस अशीच त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे वाह्यात बरळणाऱ्या ट्रम्प यांच्यापेक्षा पेन्स यांनाच उमेदवारी दिली जावी, असं रिपब्लिकन पक्षात अनेकांचं मत आहे.

पण तसं करायचं तर प्रचंड प्रमाणात गुंतागुंत सोडवावी लागेल. याचं कारण अमेरिकेत या निवडणुकीसाठी ३० टक्के मतदान एव्हाना पार पडलंय. तिकडे टपालांनी मतदानाची प्रक्रिया फार लोकप्रिय आहे. (लोकांना मतदान केंद्रांवर यावं लागत नाही, त्यामुळे टपाली पद्धतीत जास्त उत्साहात मतदान होतं, असं तिथलं शास्त्रीय पाहणीतलं निरीक्षण आहे.) म्हणजे जवळपास इतके टक्के मतदारांनी आपला हक्क बजावलाय सुद्धा. यात विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा हे देखील आले. परवा मुद्दाम शिकागोत आपल्या मूळ घरी जाऊन त्यांनी मतदान केलं. तेव्हा इतक्या साऱ्या मतांचं आता करायचं काय, हा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे आपण माघार घ्यायला हवी, असं मुळात ट्रम्प यांना वाटायला हवं. ते त्यांच्या पक्षाला वाटून उपयोगाचं नाही. पण ट्रम्प तर तसं काहीही करायच्या मनस्थितीत नाहीत. मी माघार घेण्याची सुतराम शक्यता नाही.. माघार घ्यावी असं मी काही केलेलं नाही..मला लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे, असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलंय. तेव्हा पक्ष भले नाराज असेल, पण उमेदवारच माघार घेणार नसेल तर या चर्चेला काही अर्थ नाही.

तेव्हा आजची वादफेरी ही ट्रम्प हे अध्यक्षीय निवडणूक रिंगणात तगून राहणार की नाही, हे ठरवेल. ते जिंकण्याची आता काहीही शक्यता नाही, हिलरी किती टक्क्य़ांनी जिंकणार तेच आता फक्त पहायचं.. असं आता अमेरिकेत वातावरण आहे. एका अर्थाने हे आधुनिक महाभारतचं म्हणायला हवं. फरक इतकाच की यात एका नायक होऊ पाहणाऱ्याचं वस्त्रहरण झालंय.

ता.क. : ट्रम्प यांची ही वक्तव्यं २००५ सालातली, म्हणजे ११ वर्षांपूर्वीची आहेत. पण माध्यमांनी ती प्रकाशित केल्यावर ट्रम्प ‘मी तसं बोललेलोच नाही’, ‘हा विरोधकांनी केलेला कट आहे’, ‘मला मुद्दाम बदनाम केलं जातंय’ वगैरे एकदाही म्हणालेले नाहीत. ही बाब संबंधितांनी नोंद घ्यावी अशी.