गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे त्यांच्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध आहेत. केंद्रात संरक्षणमंत्रीपदी असतानाही दिल्लीतील त्यांच्या साधेपणाचे किस्से प्रसारमाध्यमांकडून अनेकदा ऐकायला मिळायचे. मात्र, दिल्लीतून पुन्हा गोव्यात गेल्यानंतर प्रसारमाध्यांचे त्यांच्याविषयी आकर्षण तुलनेत कमी झाले होते. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगामुळे पर्रिकर पुन्हा लाईमलाईटमध्ये आले आहेत.

अचानक राज्याचे मुख्यंत्री रेल्वे स्थानकावर आल्याचे स्थानकावरील अधिकाऱ्यांना समजते आणि त्यांची धावपळ सुरु होते. मात्र मुख्यमंत्री स्टेशनच्या तपासणीसाठी नाही तर प्रवास करण्यासाठी आल्याचे नंतर कळते. पण पुन्हा मुख्यमंत्र्यांना ज्या ट्रेनने प्रवास करायचा आहे ती उशीरा असल्याचे समजते. अधिकाऱ्यांची तारांबळ उडते. मात्र त्याच वेळेत उपलब्ध असणाऱ्या दुसऱ्या एक्सप्रेस गाडीला एक विशेष डब्बा खास मुख्यमंत्र्यांसाठी जोडण्याची ‘ऑफर’ अधिकाऱ्यांकडून देण्यात येते. मात्र मुख्यमंत्री उपलब्ध गाडीच्या सेकेण्ड क्लास डब्ब्याने प्रवास करण्याला प्राधान्य देतात आणि मुख्यमंत्र्यांचा प्रवास सुरु होतो. हा सगळा प्रकार घडला गोव्यातील मडगाव स्थानकात आणि मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर!

त्याचे झाले असे की, ३१ डिसेंबरला मनोहर पर्रिकर यांनी मडगाववरून कुमता येथील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी रस्ते मार्गाऐवजी रेल्वेने जाण्याचे ठरवले. १४४ किलोमीटरच्या या प्रवासासाठी लगेच त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना या मार्गावरील ट्रेन्सची माहिती काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी जबलपूर-कोईम्बतूर एक्सप्रेसचे तिकीट काढले. मुख्यमंत्री ट्रेनच्या वेळापत्रकानुसार मडगाव स्थानकात पोहचले. मात्र जबलपूर-कोईम्बतूर एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा उशीरा येणार होती. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानकात उभ्या असलेल्या मंगळूर पॅसेंजर एक्स्प्रेसला विशेष डब्बा जोडण्याची तयारी दाखवली. मात्र, पर्रिकरांनी आपण सेकंड क्लास मधूनच प्रवास करायचे ठरवले. साहजिकच मुख्यमंत्री सेकंड क्लासने प्रवास करणार असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांची थोडीफार धावपळ झाली, त्यांना किंचित धास्तीही वाटली असावी. मात्र, पर्रिकर यांनी अगदी आनंदात हा प्रवास केला. त्यांनी प्रवासादरम्यान सहप्रवाशांबरोबर गप्पा तर मारल्याच आणि प्रवाशांसोबत सेल्फीही काढले. इंडिया रेल्वे इन्फो डॉटकॉम या साईटवर याच ट्रेनमधील प्रवाशांनी या प्रसंगाबद्दलची पोस्ट केली आहे.

मनोहर पर्रिकर हे साध्या राहणीमानासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या गोव्यातील घरापासून स्कुटरवरील प्रवासाचे फोटो इंटरनेटवर चांगलेच लोकप्रिय आहेत. त्याशिवाय मध्यंतरी त्यांनी सामान्यांप्रमाणे कोणतीही व्हीआयपी ट्रेटमेन्ट न घेता केलेला विमानप्रवास, मतदानाच्या रांगेत उभे राहणे असो किंवा लग्नाच्या रिसेप्शनसाठी रांगेत उभे राहणे असो अशा अनेक प्रसंगी त्यांनी आपले साधेपण दाखवून दिले आहे.