भविष्य काळात सर्वाधिक उपयोगी ठरू शकेल अशा गुगलच्या अॅंड्रॉइड इंस्टंट अॅपची चाचणी सुरू करण्यात आली आहे. हे अॅप सुरू झाल्यानंतर त्याचे विक्रमी डाउनलोड होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या हे अॅप फक्त काही जणांनाच वापरता येते. एकदा या अॅपचा चाचणी काळ संपला की ते सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुले करण्यात येईल. २०१६ मध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हे अॅप लाँच करण्यात आले होते. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे इतर कुठलेही अॅप डाउनलोड न करता आपल्याला हवे ते अॅप सहज वापरता येतील. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर असणाऱ्या अॅप्सचा तुम्हाला हवा तो भाग, हवा त्या वेळी उपलब्ध करुन देईल. त्यामुळे डाउनलोड न करता तुम्ही कुठल्याही अॅपचा वापर करु शकाल.

असे बऱ्याचदा होतं की जसा फोन जुना होतो तशी त्याची क्षमता कमी होते आणि तुम्हाला काही अॅप डिलीट करावे लागतात किंवा डाटा सतत डिलीट करावा लागतो. अशा वेळी इंस्टंट अॅप हे सर्वाधिक उपयोगी अॅप ठरू शकेल. एका विशिष्ट काळासाठी, विशिष्ट भागापुरतं तुम्हाला हवे असलेले अॅप वापरण्याची मुभा मिळते. त्यामुळे प्रत्येक अॅप डाउनलोड करण्याची गरज उरणार नाही. हे नवे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला नवी अॅंड्रॉइट सिस्टम अपडेट करणे आवश्यक असल्याचे गुगल प्ले चे इंजिनिअर औरश माहबोद यांनी म्हटले आहे.

काही कंपन्यांसोबत एकत्र येऊन आम्ही हे अॅप तयार करीत आहोत असे त्यांनी म्हटले. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचलले आहे असे त्यांनी सांगितले. येत्या काही महिन्यातच हे अॅप तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या अॅपवर बझफीड, विश, पेरिस्कोप यांचे परिक्षण सुरू आहे. येत्या काळात आणखी काही वापरता येतील. काही दिवसानंतर अॅमेझॉन सारख्या इ-कॉमर्स वेबसाइट येथे उपलब्ध राहतील. जर समजा तुम्हाला शूज हवे असतील तर तुम्हाला ती इ-कॉमर्स वेबसाइट डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही इंस्टंट अॅपवर शूज टाकले की इंस्टंट अॅपवर उपलब्ध असणाऱ्या सर्व इ-कॉमर्स वेबसाइटवरुन तुम्हाला माहिती मिळवता येते आणि तुम्हाला जे काही खरेदी करायचे आहे तुम्हा ते खरेदी करू शकाल.