कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आपल्या मंत्रीमंडळामध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण सावादी यांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. २०१२ साली लक्ष्मण सावादी यांना इतर दोन आमदारांसहीत कर्नाटक विधानसभेत पॉर्न पाहताना पकडण्यात आले होते. असे असताना कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही लक्ष्मण यांच्या खांद्यावर थेट इतकी मोठी जबाबदारी टाकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वादग्रस्त पार्श्वभूमी असणाऱ्या सावदी यांना इतके महत्वाचे पद देण्याच्या येडुरप्पा यांच्या निर्णयावर पक्षातील काही वरिष्ठ नेतेच नाराज झाले आहे. येडियुरप्पा यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.

२०१२ साली कर्नाटकात भाजपाचे सरकार असताना तत्कालिन मंत्री आणि भाजपा आमदार लक्ष्मण सावादी विधानसभेचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर पॉर्न क्लिप पाहत होते. त्यावेळी तत्कालिन पर्यावरण मंत्री जे. कृष्णा पालेमर आणि महिला-बाल विकासमंत्री सी. सी. पाटीलही सावदी यांच्या फोनमध्ये पॉर्न पाहताना कॅमेरांनी टिपले. विधानसभेत त्यावेळी दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा सुरु होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हे कृत्य त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले.

या घटनेवरुन राज्यात मोठा गदारोळही झाला होता. वृत्तवाहिन्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाचे व्हिडिओ दाखवले त्यावेळी सावादी यांनी आपण तो व्हिडिओ रेव्ह पार्ट्यांचे काय दुष्परिणाम असतात यावरील चर्चेची तयारी करण्यासाठी पाहत होतो असे स्पष्टीकरण दिले होते. याच मुद्द्यावरुन तीन आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र सभागृहातच पॉर्न पाहताना पकडल्या गेलेल्या तीन आमदारांना पुन्हा एकदा कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे तिकिट दिले. मात्र सावदी यांचा निवडनुकीमध्ये पराभव झाला. त्यानंतरही त्यांना मंत्रीमंडळामध्ये स्थान देण्याबरोबरच थेट उपमुख्यमंत्री पद देण्यात आल्याने भाजपाच्या नेत्यांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या प्रकरणी येडियुरप्पा यांच्यावर टीका केली आहे. ‘जनतेने निवडून न दिलेल्या व्यक्तीला भाजपाने उप मुख्यमंत्रीपद दिले आहे. भाजपाला कसलीच लाज वाटत नाही,’ अशी टिका सिद्धरामय्या यांनी केली आहे.