लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी डेव्हिड हेडली याच्या साक्षीमुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील सत्तेतील व सत्ताबाह्य़ केंद्रांच्या भूमिकेबद्दलची संदिग्धता संपेल आणि हे प्रकरण तार्किक शेवटापर्यंत जाईल, असे सरकारने म्हटले आहे.
हेडली याच्या साक्षीमुळे या हल्ल्यामागे असलेल्या सत्तेतील आणि सत्तेबाहेरील शक्तींमधील फरक संपुष्टात येईल, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले. २००८ साली १६६ जणांचे बळी घेणाऱ्या आणि इतर ३०९ लोक जखमी झालेल्या देशातील सगळ्यात भयंकर दहशतवादी हल्ल्यामध्ये कोण-कोण गुंतलेले होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. हेडली याने केलेल्या वक्तव्यांमुळे त्याचा तर्कशुद्ध शेवट होईल व त्याची आम्हाला मदत होईल, असे रिजिजू म्हणाले.
आपली पाश्र्वभूमी आणि कामाची पद्धत याबाबत हेडलीने सांगितलेल्या ताज्या माहितीची भारतीय तपासकर्ते आणि अभियोजन पक्ष यांना मदत होईल, असे रिजिजू यांनी नमूद केले.