काही दिवसांपुर्वी प्रभू रामदेखील वाढत्या बलात्काराच्या घटना थांबवू शकत नाही असं वक्तव्य करुन वाद निर्माण करणारे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपल्या वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुरेंद्र सिंह यांनी यावेळी वादग्रस्त वक्तव्य करताना, ‘हिंदुत्व अखंड ठेवायचं असेल तर हिंदू दांपत्यांनी किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे’, असं म्हटलं आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सुरेंद्र सिंह यांनी भारतात हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यासाठी हे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. ‘प्रत्येक अध्यात्मिक गुरुची इच्छा आहे की, प्रत्येक हिंदू दांपत्याने किमान पाच मुलांना जन्म द्यावा. यामुळे हिंदूंची लोकसंख्या नियंत्रित राहिल आणि हिंदुत्वही अखंड राहील’, असं सुरेंद्र सिंह बोलले आहेत.

याआधी सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशातील बालिया येथे बोलताना वाद निर्माण केला होता. ‘भारत माता की जय न म्हणारे पाकिस्तानी आहेत’, असं ते म्हणाले होते.

सुरेंद्र सिंह आणि वादाचं जुनं नात आहे. ‘देहविक्री करणाऱ्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा चांगल्या आहेत’, ‘नरेंद्र मोदी रामाचा अवतार आहेत’, ‘बलात्कारासाठी मोबाइल जबाबदार आहे’, अशी त्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच आहे.

Story img Loader