करोनासोबत लढण्यासाठी जगभरात लसीकरणाचाच शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. परंतु अद्यापही अनेकांमध्ये लसीकरणाबाबत अफवा व गोंधळची स्थिती आहे. यामुळे अनेक जण लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. मध्य प्रदेशातही लस घेण्यापासून वाचण्यासाठी एका व्यक्ती चक्क झाडावर ठाण मांडून बसली होती. त्याने झाडावर चढताना त्याच्या पत्नीचे आधार कार्डही सोबत नेले होते. त्यामुळे त्याने स्वत: ही लस घेतली नाही, तर पत्नीलाही लस घेण्यापासून रोखले.

मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील पाटण कला गावात एक व्यक्ती लस घेण्यापासून बचाव करण्यासाठी झाडावर चढली होती. त्यानंतर अनेकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कोणाचेच ऐकले नाही आणि तो झाडावरच बसून राहिला. लसीकरण केंद्रावरील लस संपल्याशिवाय ती व्यक्ती खाली उतरलीच नाही. पाटण कला गावात राहणाऱ्या कंवरलालला लस घेण्यासाठी केंद्रावर बोलवण्यात आले होते. पण तो गेला नाही. त्यानंतर गावातील लोक त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला लसीकरण केंद्रात जाण्याची विनंती केली, तरीही तो जाण्यास तयार नव्हता.

पत्नीचे आधार कार्ड घेऊन घरातून गेला पळून

माध्यमांच्या वृत्तानुसार, गावातील कंवरलाल हा लस घ्यायला तयार नव्हता. गावकऱ्यांनी अनेकदा त्याला लस घ्यावी यासाठी आवाहन केले पण कोणाचेही ऐकण्यास ते त्याने नकार दिला. यानंतर लोकांनी त्याच्या पत्नीची समजूत काढत लसीकरणासाठी तयारी केले आणि तिला लसीकरण केंद्रात नेले. दरम्यान, कंवरलाल याला याची माहिती मिळाली. तो पत्नीचे आधार कार्ड घेऊन घराबाहेर पडला आणि झाडावर चढून बसला. गावकऱ्यांनी त्याला अनेक विनंत्या केल्या मात्र तो खाली उतरला नाही. शेवटी लसीकरण केंद्रातील लसी संपल्याची खात्री पटल्यानंतरच तो खाली उतरला.

अफवांमुळे लस घेण्याची भीती

कंवरलालच्या मनात अशी भीती आहे की लस घेतल्याने अति ताप, शरीरावर वेदना आणि सर्दी सारखे आजार होतात आणि नंतर त्रास होतो. या कारणामुळे, त्याने स्वत:ही लस घेतली नाही आणि पत्नीलाही घेऊ दिली नाही.

दरम्यान, पाटण कला गावात लसीकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून येत आहे. लस घेण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी केंद्रावर जात आहेत. बीएमओचे डॉक्टर राजीव हरिऔध यांनी सांगितले की, ज्या व्यक्ती लस घेत नाही आणि त्या भीतीने पळ काढत आहे, त्यांची माहिती मिळाली आहे. आमचे कर्मचारी त्याच्या घरी जाऊन लसीबाबत असलेले गैरसमज दूर करुन लस देईल असे सांगितले.