हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरत असल्याने जगातील सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे. पण अमेरिकेत एका संशोधनामध्ये Covid-19 वर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन तितके प्रभावी ठरत नसल्याचे समोर आले आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळचे मलेरियाविरोधी औषध आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मलेरिया, संधिवात आणि लूपस हे ऑटो इम्युन आजार असलेल्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळया दिल्या जातात. अमेरिकेत HCQ हे औषध घेऊनही मृत्यूदर कमी झालेला नाही. अमेरिकेच्या डेट्रॉइट शहरातील सिनाई ग्रेस आणि हेन्री फोर्ड रुग्णालयातील संशोधकांनी हा अभ्यास केला. HCQ कितपत प्रभावी आहे हे तपासण्यासाठी Covid-19 ची लागण झालेल्या ६३ रुग्णांची निवड करण्यात आली.

रुग्णालयात दाखल असलेल्या ३२ जणांच्या एका गटाला HCQ गोळया देण्यात आल्या. एक ते दोन दिवस ४०० एमजीच्या दिवसाला दोन गोळया देण्यात आल्या. त्यानंतर तीन ते चार दिवस दररोज २०० ते ४०० एमजीची दिवसाला एक गोळी देण्यात आली. Covid-19 च्या ३१ रुग्णांच्या दुसऱ्या गटावर फक्त अन्य उपचार सुरु होते. त्यांना HCQ गोळी देण्यात आली नाही.

पाच दिवसानंतर HCQ गोळया घेणाऱ्या गटाला श्वसनक्रियेसाठी सपोर्ट् म्हणजे मदतीची गरज भासली. भारत हा HCQ गोळयांचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या औषधाला गेमचेंजर म्हणाले असून त्यांनी या गोळयांच्या निर्यातीसाठी भारतावर दबाव टाकला. HCQ गोळयांचे काही साईडइफेक्टसही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळया घेऊ नका असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.