देशात सध्या करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. दररोजची मोठ्याप्रमाणावर वाढत असलेली रूग्णसंख्या ही चिंताजनक बाब ठरत आहे. करोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी देशाच्या माजी पंतप्रधानांपर्यंत सर्वच अडकत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील करोनाची लागण झालेली आहे. करोनामुळे देशातील दिवसेंदिवस बिकट होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राहुल गांधींकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. आता देखील त्यांनी गृह विलगीकरणात असूनही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

“घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ करोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींना करोनाची लागण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी नियमांचं पालन करण्याचे देखील आवाहन केले होते. याशिवाय, राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा देखील केली होती.

केंद्राचे लस धोरण भेदभाव करणारे

तसेच, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस धोरणावर देखील टीका केलेली आहे. केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

तुघलकी लॉकडाउन ते प्रभूगान, ही मोदी सरकारची रणनीती – राहुल गांधी

याशिवाय, “केंद्र सरकारची कोविड रणनीती – स्टेज १ – तुघलकी लॉकडाउन लावा, स्टेज २ – थाळी वाजवा, स्टेज ३ – प्रभूगान.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवरच्या रणनीतीवर टीका देखील केलेली आहे.

“ना ऑक्सिजन, लस देखील नाही… केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे”

“ना चाचण्या, ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?” असं देखील या अगोदर राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे.