मी जैन नाही तर मागच्या सात पिढ्यांपासून हिंदू वैष्णव आहे. असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसला ‘करारा जवाब’ दिला आहे. एवढेच नाही तर जैन आणि हिंदू यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतो आहे असाही आरोप त्यांनी केला. माझ्यावर टीका करणाऱ्या काँग्रेने लक्षात घ्यावे की जैनही आमचे बांधवच आहेत, असेही अमित शाह यांनी सुनावले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हिंदू नाही तर जैन आहेत तरीही ते हिंदू धर्माबाबत बोलतात. तसेच धर्माचे राजकारण करतात, अशी टीका काँग्रेसने केली. त्यावर अमित शाह यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत खरमरीत उत्तर दिले आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषेदत अमित शाह यांनी मोदी सरकारचे गोडवेही गायले. मोदी सरकार हे सर्वात पारदर्शी, प्रामाणिक आणि देशाला स्थिर सरकार देणारे सरकार आहे. असे अमित शाह यांनी म्हटले आहे.एक काळ असा होता की आमचे फक्त दोन सदस्य होते. आता मात्र संसदेत आमच्याकडे ३०० पेक्षा जास्त खासदार आहेत. १० सदस्य संख्या असलेल्या पार्टीचे सध्या १० कोटीपेक्षा जास्त सदस्य आहेत. अमित शाह यांनी मुंबईत झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हजेरी होती.
याच पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसचाही निषेध केला. काँग्रेसच्या खासदारांनी गदारोळ घालत अधिवेशनाचे कामकाज चालू दिले नाही. त्याचा निषेध म्हणून भाजपाचे खासदार १२ एप्रिलला एक दिवस धरणे आंदोलन करणार आहेत असेही अमित शाह यांनी जाहीर केले. तसेच महात्मा फुले यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात अत्यंत उत्साहात साजरी केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार सर्वोत्तम सरकार आहे. २०१९ च्या निवडणुका आम्हीच जिंकू असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी हे जगातल्या सगळ्यात सुप्रसिद्ध नेते आहेत. ११ कोटी कार्यकर्ते आता निवडणुकीच्या मदतीला उतरले आहेत. २०१९ च्या निवडणुका आम्हीच जिंकू प्रचंड बहुमताने जिंकू, तसेच देशावर पुन्हा एकदा भाजपाची सत्ता होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही राज्यात आणि देशात भाजपाला पूर्ण बहुमत मिळूनही एनडीएचेच सरकार स्थापन केले आहे. २०१९लाही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे असेही अमित शाह यांनी जाहीर केले.