तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोसहाली यांच्या खळबळजनक वकव्यामुळे केंद्र सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ३१ डिसेंबर २०१४च्या रात्री भारतीय हद्दीत शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेली संशयित पाकिस्तानी नौका मी स्फोट करून उडवून देण्यास सांगितले होते. आपल्याला त्यांचा (पाकिस्तानचा) बिर्याणी खायला घालून पाहुचणार करायचा नाही, असे सांगत आपण पाकची नौका उडवण्याचे आदेश दिल्याचे विधान लोसहाली यांनी केले. मात्र, काही दिवसांपूर्वी भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाकडून अगदी याउलट माहिती पुरविण्यात आली होती. त्यामुळे लोसहाली यांच्या वक्तव्याने नौदल आणि संरक्षण मंत्रालयाची चांगलीच गोची झाली आहे. 

३१ डिसेंबरच्या रात्री गुजरातच्या सागरी क्षेत्रात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी नौकेचा मुद्दा मध्यंतरी चांगलाच गाजला होता. या एकूणच प्रकारावर संशयाचे मोठे सावट होते. त्यावेळी भारतीय नौदलाकडून पाठलाग सुरू असताना, नौकेवरील लोकांनी स्वत:हून नौका पेटवून किंवा स्फोटकांनी उडवून दिल्याचा दावा भारतीय यंत्रणांकडून करण्यात आला होता. मात्र, त्यावेळीही प्रसारमाध्यमांकडून या घटनेच्या स्वरूपाविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली होती. एखाद्या लहानशा नौकेचा पाठलाग करण्यासाठी नौदलाने एवढ्या ताकदीचा वापर का करावा, हा मुद्दादेखील उपस्थित झाला होता. त्यामुळे आता लोसहाली यांच्या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

‘त्या’ जहाजावरील दहशतवाद्यांनी विष घेतले असावे- मनोहर पर्रिकर

तस्कर नव्हे दहशतवादीच!

उद्ध्वस्त झालेल्या ‘त्या’ संशयित पाकिस्तानी नौकेभोवतीचे गुढ कायम