सध्या देशात जेईई व नीट परीक्षेच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलच तापल्याच दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या व्हिडिओतून देशभरातील विद्यार्थ्यांना उद्देशून भाष्यं केलं आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांना विचारात घेऊनच घ्यायला हवा, असा सल्ला देखील सरकारला दिला आहे.

”माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मला तुमच्याबद्दल वाईट वाटते. तुम्ही या क्षणी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरं जात आहात. तुमची परीक्षा केव्हा, कुठं आणि कशी होईल? हे केवळ तुमच्यासाठीच नाहीतर तुमच्या परिवारासाठी देखील महत्वपूर्ण आहे. तुम्ही आमचे भविष्य आहात. एका चांगल्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. अशावेळी तुमच्या भविष्याशी निगडीत कोणता निर्णय घ्यायचा असेल, तर हे महत्वाचे आहे की तुम्हाला विचारात घेऊनच तो घ्यायला हवा. मला अपेक्षा आहे की सरकार तुमचे म्हणने ऐकेल, तुमचा आवाज ऐकेल व तुमच्या इच्छेनुसार काम करेल. हाच माझा सरकारला सल्ला आहे. जय हिंद…”असे त्यांनी म्हटले आहे. या व्हिडिओखाली #SpeakUpForStudentSafety या हॅशटॅगचा वापर करण्यात आलेला आहे.

आणखी वाचा- नीट, जेईई परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका, महाराष्ट्रासह सहा राज्यांचं निर्णयाला आव्हान

आणखी वाचा- “तुम्ही करायचं तेवढं नुकसान केलं आहे, आता तरी…,” राहुल गांधींची मोदी सरकावर टीका

नीट आणि जेईई परीक्षेवर स्थगिती आणली जावी यासाठी सर्वोच्च न्यायालयत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सहा राज्यांकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तसेच प्रवासात येणाऱ्या अडचणींची दखल घेतली नसल्याचे पुनर्विचार याचिकेत म्हटले गेले आहे.

आणखी वाचा- अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

१७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगरभाजप सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिय गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावल्यानंतर ही याचिका करण्यात आली आहे.