करोना संकटात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यावरुन टीका होत असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कुंभमेळ्याला ‘सुपर स्प्रेडर’ म्हणणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. १ जानेवारीपासून ते कुंभमेळा संपेपर्यंत हरिद्धारमध्ये करण्यात आलेल्या एकूण आरटीपीसीआर चाचण्यांपैकी फक्त ०.२ टक्के पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच कुंभमेळ्यासाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांपैकी फक्त ०.५ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचं त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.

कुंभमेळ्याची जबाबदारी असणारे पोलीस महानिरीक्षक संजय गुंजयाल यांनी सांगितलं आहे की, “१ एप्रिल रोजी जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्र, हरियाणासारख्या राज्यात करोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णसंख्या वाढत होती”.

कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी; करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन

“जर आपण हरिद्वार जिल्ह्याचा १ जानेवारी ते ३० एप्रिलला कुंभमेळा संपेपर्यंतचा कोविड डेटा नीट पाहिला तर करोना संकटात कुंभमेळा सुपर स्प्रेडर ठरल्याचं दर्शवण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचं लक्षात येतं,” असं संजय गुंजयाल यांनी म्हटलं आहे. कुंभमेळ्यात संजय गुंजयाल यांच्यावर हरिद्धार आणि आसपासच्या परिसरातील सुरक्षेची जबाबदारी होती.

हरिद्धारमध्ये १ जानेवारी ते ३० एप्रिलदरम्यान एकूण ८ लाख ९१ हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामधील १९५४ चाचण्या (०.२ टक्के) पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कुंभमेळ्याला ‘सुपर स्प्रेडर’ का म्हणू शकत नाही याचं अजून एक स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “कुंभमेळ्यासाठी १६ हजार पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं. ३० एप्रिलपर्यंत यामधील फक्त ८८ म्हणजेच ०.५ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली”.

सुरक्षेसाठी तैनात कर्मचारी थेट संपर्कात येत असतानाही करोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पुढे बोलताना त्यांनी १ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान ५५ लाख ५५ हजार ८९३ कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले होते, यामधील १७ हजार ३३३ पॉझिटिव्ह आले होते अशी माहिती दिली.

कुंभमेळ्याला देशभरातून लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याने मोदी सरकावर जोरदार टीका करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुंभमेळ्याची दखल घेण्यात आली होती. १७ एप्रिल रोजी मोदींनी प्रतिकात्मक पद्धतीने कार्यक्रम पार पडण्याचं आवाहन केलं होतं.