आदित्यनाथ यांचे प्रतिपादन

लखनऊ : वाढती लोकसंख्या हाच विकासाच्या प्रक्रियेतील खरा अडथळा आहे, लोकसंख्या नियंत्रणासाठी जास्तीत जास्त प्रयत्नांची गरज आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या अधिकृत निवासस्थानी लोकसंख्या दिनानिमित्त ते बोलत होते.

उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० जाहीर करताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. जगात वेळोवेळी वाढती लोकसंख्या हा विकासातील अडथळा असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली चार दशके लोकसंख्या वाढतच आहे. देशाने व राज्यांनी याबाबत प्रयत्न केले. त्यातून काही सकारात्मक बाबी सामोऱ्या आल्या. उत्तर प्रदेशात समाजाचे घटक विचारात घेऊन लोकसंख्या धोरण राबवले जाईल असे त्यांनी सांगितले. लोकसंख्या नियंत्रणाच्या विधेयकाचा मसुदा राज्य कायदा आयोगापुढे पडून होता. त्यानंतर आता त्यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या विधेयकाच्या मसुद्यानुसार लोकसंख्या नियंत्रण व स्थिरीकरण या दोन्ही उद्दिष्टांसाठी शाश्वत विकास व सम वितरणास प्राधान्य दिले पाहिजे.

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून त्यामध्ये दोन अपत्ये धोरणाचे उल्लंघन करणाऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येणार नाही, त्याचप्रमाणे सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही आणि बढतीही मिळणार नाही. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेता येणार नाही, असे प्रस्तावित करण्यात आले आहे.

प्रस्तावित विधेयकातील तरतुदी या ‘उत्तर प्रदेश लोकसंख्या (नियंत्रण, स्थैर्य आणि कल्याण) विधेयक २०२१’ याचा भाग आहेत, असे राज्याच्या विधी आयोगाने म्हटले आहे. विधेयकाच्या मसुद्यात सुधारणा करण्यासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी १९ जुलै हा अखेरचा दिवस आहे, असे उत्तर प्रदेश राज्य विधी आयोगाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.