चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा कुठलाही हल्ला परतवून लावण्यासाठी भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यात निपुण असलेली विशेष फोर्स तैनात केली आहे. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व सेक्टरच्या सीमारेषेवर ही विशेष माऊंटन फोर्स तैनात झाली आहे.

कुठल्याही परिस्थितीत नियंत्रण रेषा सुरक्षित ठेवण्याचे भारतीय लष्कराला निर्देश देण्यात आले आहेत. चीनने गलवान खोऱ्याजवळ मोठया प्रमाणात सैन्याची जमवाजमव करुन ठेवली आहे. चीनची युद्धवाहने देखील इथे मोठयाप्रमाणामध्ये आहेत. मागच्या अनेक वर्षात भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यासाठी विशेष तुकडयांना प्रशिक्षित केले आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

छापेमारी युद्ध कलेत हे सैनिक पारंगत आहेत. कारगिल युद्धाच्यावेळी या सैन्य तुकडयांनी आपली क्षमता दाखवून दिली होती. डोंगराळ भागात युद्ध लढणं सोपं नाही. हे खडतर आव्हान असते. मानवीहानी देखील मोठया प्रमाणावर होऊ शकते. उत्तराखंड, लडाख, गोरखा, अरुणाचल आणि सिक्कीममधून येणारे जवान या युद्धकलेत पारंगत आहेत. त्याला कुठलीही तोड नाही. तोफखान किंवा मिसाइल जरी असले तरी, डोंगराळ भागातील युद्धामध्ये निशाणा अत्यंत अचूक असावा लागतो. अन्यथा तुम्ही केलेला वार वाया जाऊ शकतो.

चीननेही मान्य केलं भारताकडे सरस फोर्स
काही दिवसांपूर्वी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी (पीएलए) उपकरणे तयार करणार्‍या कंपनीच्या अधिकाऱ्याने आणि चीनशी संबंधित लष्करी तज्ज्ञांनी भारताच्या माऊंटन फोर्सचं कौतुक केलं होतं. “भारताकडे जगातील सर्वात मोठे आणि उंचावरील युद्धांसाठी प्रशिक्षण देण्यात आलेलं अनुभवी सैन्य आहे. अशा उंच ठिकाणी लढाई लढताना आवश्यक असणारे गिर्यारोहणाचे कौशल्य प्रत्येक भारतीय सैनिकाकडे आहे,” असं मत व्यक्त केलं होतं.

हे कौतुक विशेष का?
लष्करी आणि संरक्षणासंदर्भातील माहिती देणारे ‘मॉडर्न वेपनरी’ हे एक महत्वाचे मासिक मानले जाते. विशेष म्हणजे हे मासिक चीन सरकारच्या मालकिच्या चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडशी (एनओआरआयएनसीओ) संबंधित आहे. पीएलएसाठी यंत्रे, डिजिटलाइज्ड आणि स्मार्ट उपकरणे विकासित करण्याची मुख्य जबाबदारी एनओआरआयएनसीओकडे आहे. ही कंपनी ही जगातील सर्वात मोठ्या संरक्षण कंत्राटदारांपैकी एक आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगच्या यांच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाशी संबंधित कामांमध्येही या कंपनीचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे अशा कंपनीच्या मालकीच्या मासिकाच्या संपादकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक होणं हे विशेष मानलं जातं आहे.