करोनाचे संकट देशावर आलेले असताना देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व लाभणे हे आपले नशीब असल्याचे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे. “पंतप्रधान मोदींनी करोनासंदर्भातील संभाव्य धोक्याची आधीच कल्पना दिली होती. हा साथीला तोंड देण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले.  भारताला नाशिबाने पंतप्रधान मोदींसारखे नेतृत्व मिळाले आहे,” असं योगी यांनी म्हटलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

उत्तर प्रदेशमधील करोनासंदर्भातील परिस्थितीसंदर्भात बोलताना योगी यांनी मार्चपासूनच राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. “करोनाविरुद्ध योग्य वेळी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जे निर्णय घेण्यात आले त्यामुळेच भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्यूचा दर नियंत्रित ठेेवण्यात यश आला. उत्तर प्रदेश सरकराने मार्चपासूनच करोनासंदर्भातील तयारी सुरु केली होती. पंतप्रधान मोदींनी होळीसंदर्भातील कार्यक्रम स्थगित करण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. त्याचवेळी करोनाच्या संकटाची चाहूल लागली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला होता. होळीनंतर लगेचच प्रशासनाच्या बैठकी घेऊन आम्ही शाळा, कॉलेज आणि इतर शिक्षण संस्था टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंदर्भातील घोषणा आम्ही केल्या. त्यानंतर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु झाला,” असं योगी म्हणाले.

मोदींचे कौतुक करताना त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा झाल्याचेही योगी म्हणाले. “पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन आम्हाला फायद्याचे ठरले. मोदींचा मार्गदर्शनानुसार ज्या ठिकाणी काम करुन निर्णय घेण्यात आले तेथे करोनावर मात करण्यात चांगले यश मिळाले आहे. ज्या घटना घडणार आहेत त्याबद्दल  पंतप्रधान मोदींनी सर्वांना इशारा दिला होता. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला संसर्गाच्या दृष्टीकोनातून आणि मृत्यूदर कमी रहावा यासंदर्भात जे निर्णय घेण्यात आले त्याचा परिणाम आज आपल्या सर्वांना दिसत आहे. लॉकडाउनच्या चार टप्प्यांमध्ये करोना संकटापासून राज्याला वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. आमच्यासमोर आव्हाने आहेत. आमच्याकडे या आव्हानांना तोंड देण्यासाठी योजना असून त्यापद्धीतीने काम सुरु आहे. हे एक टीम वर्क आहे. केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि सामान्य जनता असे सर्व मिळून यासंदर्भातील अंमलबजावणी करत आहे. भारत सरकारचे चांगले सहकार्य मिळत आहे,” असं योगींनी स्पष्ट केलं.  करोनाच्या साथीच्या काळात ३६ लाख लोकांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही योगींनी दिली.

काँग्रेस कुठेच दिसली नाही

एकीकडे मोदींचे कौतुक करताना योगींनी काँग्रेसबरोबरच विरोधी पक्षांवर निशाणा साधला. श्रमिकांसाठीच्या बस गाड्यांवरुन उत्तर प्रदेशमध्ये तापलेल्या राजकारणासंदर्भात भाष्य करताना योगींनी काँग्रेसवर टीका केली.  “करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये काँग्रेस कुठेच दिसली नाही. या काळामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केवळ राजकारण केलं. काँग्रेसने अडकलेल्या श्रमिक मजुरांसाठी कोणत्याही बस उपलब्ध करुन दिलेल्या नव्हत्या. ज्या बस त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या त्या श्रमिकांची ने-आण करण्यासाठी योग्य नव्हत्या. तरी काँग्रेसकडून या बसच्या मुद्द्यासंदर्भात सतत खोटे दावे करण्यात आले,” असं योगी म्हणाले.

“संपूर्ण जगाला ठाऊक आहे केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकाराने सामान्य नागरिकांसाठी, तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काय केलं आहे हे ही सर्वांना ठाऊक आहे. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये काँग्रेसचे हे खानदान आणि इतर मित्रपक्षांची उपस्थिती कुठेच दिसून आली नाही. केवळ वक्तव्य करत होते. देश करोनाविरुद्धाची लढाई लढत होते हे लोकं मध्ये व्यत्य आणत होते. देशातील जनतेचे मनोबल कमजोर करत होते. हे कायमच होत आलं आहे काँग्रेस असो समाजवादी पक्ष असो किंवा इतर विरोधी पक्ष असो सर्वांचे चरित्र पाहिले तर त्यांच्या या खलनायकी चरित्र जनतेने खूप जवळून अनुभवले आहे,” असा टोलाही योगींनी लगावला आहे.